Solapur, 24 October : सोलापूर शहर मध्य मतदारसंघ न सोडल्याने शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आहे. शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेला सोडला नाही तर आम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पाचही जागा लढून आणि भाजपचे उमेदवार पाडल्याशिवाय राहणार नाही.
ज्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून भाजप राज्यात सत्तेत आला, त्याचा बाळासाहेबांचा फोटो लावून आम्ही भाजपचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर शहर मध्य मतदारसंघ (Solapur City Central Constituency) शिवसेनेला न सोडल्याने पक्षाच्य वतीने आज पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
शिंदे म्हणाले, सोलापूर शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेला सोडला नाही, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पाचही जागा भाजपच्या विरोधात लढविण्यात येतील. त्या पाचही जागा आम्ही जिंकू आणि जिंकता आल्या नाही तर भाजपच्या त्या पाचही जागा पाडल्याशिवाय राहणार नाही.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघासह पाच विधानसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत. आम्ही अजूनही वेळ देतोय. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगावं. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यत आम्ही फार्म भरण्याचे थांबणार आहोत. जागा न सोडल्यास आम्ही शेवटच्या दिवशी फॉर्म भरणार आहोत, असेही शिंदे यांनी सांगितले.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची जागा आम्हाला दिली नाही तर आमच्यापुढे कुठलाही पर्याय राहणार नाही. कारण, सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा जागांपैकी पाच जागा भारतीय जनता पक्ष लढत आहे. हा किती विरोधाभास आहे. एकच पक्ष पाच पाच जागा लढवणार. आमचे चार-चार आमदार जिल्ह्यात राहिलेले आहेत, त्या शिवसेनेला एकही जागा द्यायची नाही, असा सवाल शिंदे यांनी केला.
शिंदे म्हणाले, सोलापूर शहर मध्य मतदारसंघात गेल्या वेळी शिवसेना लढली. या निवडणुकीतही हा मतदारसंघ आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा होती आणि अजूनही आहे. पण, माध्यमांतून ज्या बातम्या येत आहेत. शिवसेनेला गृहीत धरून भारतीय जनता पक्ष काही निर्णय सोलापूर जिल्ह्यात करण्याचा घाट घालत आहे, त्या विरोधात आम्ही आज ही भूमिका घेत आहोत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोहोळची जागा सुटली आहे. भारतीय जनता पक्षाचे पाच पैकी चार आमदार आहेत. अजूनही त्यांची हाव संपत नाही. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात भाजपला उमेदवार नाही. पण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आयात करून घेतलेले देवेंद्र कोठे यांना उमेदवारी देणर आहोत, असे आम्ही ऐकतोय.
बाहेर आणून तुम्ही आमच्यावर उमेदवार लादणार आहात. लोकसभेला तुम्ही भाजपचे काम केले, विधानसभेला पुन्हा भाजपला मदत करा आणि महापलिकेत तुम्ही म्हणणार, तुमचा पक्ष कुठं आहे, असा सवाल त्यांनी केला.
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आम्ही ही भूमिका घेत आहोत. या निर्णयाचा महाराष्ट्रामधील युतीचा काहीही संबंध नाही. सोलापुरातील शिवसेना संपू नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पाचही जागांवर भाजपच्या विरोधात निवडणूक लढवणार आहोत.
ज्या ठिकाणी आमचा उमेदवार कमकुवत असेल तर इतरांना पाठिंबा देण्याची भूमिका घेऊन भाजपचे उमेदवार पाडण्याचे काम केले जाईल. आम्ही तर संपू; पण सोलापूर जिल्ह्यातून भाजपही संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी दिला.
सोलापूर शहर उत्तरमधून अमोल शिंदे, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून मनोज शेजवाल, अक्कलकोटमधून अभिजित पाटील, दक्षिणमधून आण्णासाहेब सत्तू (ग्रामीण) आणि उमेश गायकवाड (शहर), मंगळवेढा अशोक चौडे शिवसेनेचे उमेदवार असतील. वेळप्रसंगी आम्ही पाच ते दहा हजार मते घेऊ पण तुमचा पराभव केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाटाघाटी होतील, त्यातून सोलापूर शहर मध्यची जागा आम्हाला शिवसेनेच्या तिकिटावर लढायला मिळेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. याचा राज्यातील युतीशी काहाही संबंध नाही. शिवसेनेला एकही जागा मिळणार नसेल तर आम्ही आमचा पक्ष बंद ठेवावा लागेल. शिवसेनेला संघर्ष नवा नाही. ज्या बाळासाहेबांचा फोटो भाजप राज्यात सत्तेत आला, त्याचा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून आम्ही आता भाजपचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.