

Mumbai, 22 February : राज्यातील 12 जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सोमवार किंवा मंगळवारपासून (ता. 24 फेब्रुवारी) सुरू होण्याची शक्यता आहे. या 12 जिल्हा परिषदांपैकी सोलापूर, सिंधुदुर्ग आणि परभणीमध्ये भाजपची सत्ता निश्चितपणे येऊ शकते. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला, तर रत्नागिरीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. लातूर आणि संभाजीनगरमध्ये महायुतीची घोषणा झाली आहे, त्यामुळे सात जिल्हा परिषदांमधील सत्तेचे चित्र स्पष्ट आहे. इतर पाच ठिकाणी कोणाची सत्ता येणार, याची प्रचंड उत्सुकता राज्याला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) पुणे, सोलापूर, कोल्हापूर सातारा, सांगली, कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, संभाजीनगर, परभणी जिल्हा परिषदांच्या आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यामध्ये सांगली आणि लातूर वगळता बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये महायुतीमधील तीन पक्षांनीच सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये कोणाची सत्ता येणार, याचे औत्सुक्य आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली 68 पैकी 38 जागा जिंकून बहुमत मिळविले आहे, त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचा पहिल्यांदाच अध्यक्ष होणार आहे. आता जिल्हा परिषदेचा (Zilla Parishad) अध्यक्ष कोण होणार, याबाबतची उत्सुकता असणार आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीमधील तीनही पक्ष स्वतंत्र लढले होते. भाजपने २७ जागा जिंकल्या आहेत. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती, त्या आघाडीकडे ३५ जागांचे बहुमत आहे. मात्र, सत्तेचा दावा अजूनही त्यांच्याकडून करण्यात आलेला नाही. भाजपने या ठिकाणी अध्यक्ष करण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे.
सांगलीत (Sangli) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वाधिक १८ जागा जिंकल्या आहेत. त्या ठिकाणी महायुतीमधील सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. मात्र दोन्ही राष्ट्रवादीची सांगलीत आघाडी होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन या ठिकाणी सत्ता स्थापन करावी, अशी अपेक्षा माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे भाजपनेही अजितदादांच्या राष्ट्रवादीवर सोबत येण्यासाठी दबाव वाढवला आहे, त्यामुळे सत्तासाठी दोन्ही पक्षांना राष्ट्रवादीची गरज भासणार आहे.
कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या वर्षभरापासून केलेल्या मशागतीला जिल्हा परिषदेमध्ये यश आले आहे. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक २० जागा जिंकून राष्ट्रवादीने (NCP) अध्यक्षपदावर दावा केला आहे. त्यामुळे महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र येणार की आमचं ठरलंय पॅटर्न जिल्हा परिषदेच्या राजकारणात पुन्हा दिसणार याबाबत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ५३ जागा जिंकल्या आहेत. त्यांना पुणे जिल्ह्यातील जनतेने प्रचंड बहुमत पुन्हा एकदा दिले आहे, त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होणार हे निश्चित मानले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रानंतर रायगडमध्ये सर्वाधिक चुरस दिसून येत आहे. रायगडमध्ये एकूण ५९ जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक २१ जागा जिंकल्या आहेत. पण शिवसेना एकटी लढली होती. महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपने आघाडी केली होती. त्यामुळे या आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. तशी बोलणीही या दोन पक्षांत झाल्याचे समजते. पण राज्यातील इतर जिल्हा परिषदांमधील गणितं त्यामुळे फिस्कटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रायगडवर बरीच गणितं अवलंबून असणार आहेत.
रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकहाती वर्चस्व राखले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 जागांपैकी तब्बल 40 जागा ह्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. इतर पक्षांना दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही, त्यामुळे रत्नागिरीत सामंत म्हणतील ती पूर्वदिशा असणार आहे.
मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती आहे. या ठिकाणी भाजपने सर्वाधिक १८ जागा जिंकल्या आहेत, त्यांना महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता आहे, त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेत भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्ष होऊ शकतात.
लातूर जिल्हा परिषदेच्या एकूण ५९ जागांपैकी सर्वाधिक २३ काँग्रेसने जिंकल्या आहेत. पण त्यांना बहुमतासाठी सात जागा कमी पडत आहेत. अपक्ष, मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना यांची बेरीज केली तरी काँग्रेसचे बहुमत होऊ शकत नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर लातूरमध्ये भाजपचा अध्यक्ष होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. तशी घोषणा इथे झाल्याची माहिती आहे.
संभाजीनगरमध्ये भाजप (23) आणि शिवसेना (20) एकत्र येऊ सत्ता स्थापन करू शकतात. कारण इतर कोणत्याही पक्षांकडे सत्ता स्थापन करण्याएवढं बहुमत नाही, त्यामुळे या दोन्ही पक्षाला एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी युतीची घोषणा केली आहे. परभणीत भाजपच्या मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणार नसल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे परभणीत शिवसेना-भाजपची सत्ता येणार हे निश्चित मानले जाते.
राज्यातील 12 जिल्हा परिषदांमधील पक्षनिहाय बलाबल
सोलापूर : एकूण जागा 68
भाजपा - 38
राष्ट्रवादी अजित पवार - 11
राष्ट्रवादी शरद पवार - 5
शिवसेना (शिंदे गट) - 8
शेकाप - 3
करमाळा स्थानिक आघाडी - 2
तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1
........................................
सातारा : एकूण ६५
भाजप : २७
राष्ट्रवादी : २०
शिवसेना : १५
काँग्रेस : १
स्वाभिमानी : १
अपक्ष : १
........................
सांगली : एकूण ६१
राष्ट्रवादी (शप) : १८
भाजप : १६
काँग्रेस :११
राष्ट्रवादी : ०६
शिवसेना : ०७
शिवसेना ठाकरे : १
रयत क्रांती संघटना : १
जनसुराज्य : १
...........................
कोल्हापूर : एकूण 68
राष्ट्रवादी - 20
काँग्रेस - 15
भाजप - 13
शिवसेना (शिंदे) - 9
जनसुराज्य - 5
शिवसेना (ठाकरे) - 1
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4
............................
पुणे : एकूण ७३
राष्ट्रवादी : ५१
भाजप : १०
शिवसेना ठाकरे : ०६
शिवसेना : ०५
राष्ट्रवादी (शप) : ०१
रत्नागिरी : एकूण 56
भाजप- 04
शिंदे शिवसेना - 40
राष्ट्रवादी अजित पवार गट- 5
शिवसेना ठाकरे गट - 6
मनसे -1
काँग्रेस - 0
राष्ट्रवादी शरद पवार गट -0)
अपक्ष - 0
.....................
रायगड : एकूण ५९
शिवसेना : २१
राष्ट्रवादी : १६
भाजप : १५
शिवसेना ठाकरे : ०५
काँग्रेस : ०२
...............
सिंधुदुर्ग : एकूण जागा : 50
भाजप : 27
शिवसेना (शिंदे गट) : 14
शिवसेना (उबाठा) : 3
अपक्ष : 6
धाराशिव : एकूण जागा - 55
भाजप -18
शिवसेना शिंदे गट - 15
शिवसेना ठाकरे गट - 8
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - 6
अपक्ष - 4
काँग्रेस - 3
समाजवादी पक्ष - 1
...........................
लातूर : एकूण जागा ५९
भाजप : 18
काँग्रेस : 23
शिवसेना : 01
शिवसेना UBT: 01
NCP अजित पवार : 12
NCP शरद पवार : 01
मनसे : 01
अपक्ष : 02
............................
संभाजीनगर : एकूण जागा ६३
भाजप : 23
शिवसेना : 20
शिवसेना UBT: 9
NCP : 4
NCP SP ; 1
काँग्रेस : 1
वंचित : 00
MIM: 0
अपक्ष : 5
..................
परभणी : एकूण जागा ५४
भाजप : २४
काँग्रेस : ०३
शिवसेना : ०५
राष्ट्रवादी : १५
शिवसेना उबाठा : ६
अन्य : ०१
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.