कोल्हापूर : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या छातीत दुखत असून, त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील (Kolhapur) राजर्षी छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात हलवण्यात येत आहे. पोलीस त्यांना घेऊन रुग्णवाहिकेतून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सार्वजनिक सुटी जाहीर झाल्याने राणेंच्या जामिनारील आजची न्यायालयीन सुनावणी पुढे ढकलली गेली आहे.
नितेश राणेंनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे हृदयरोगतज्ञ नसल्याने त्यांना कोल्हापूरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या रक्तातील साखर कमी झाल्याने आणि मणक्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने कोल्हापूरला हलवण्यात आले नव्हते. त्यांची प्रकृती थोडी स्थिर होताच त्यांना रुग्णवाहिकेतून कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. दरम्यान, राणेंना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली दोन दिवसांपासून सुरू होत्या. राणेंसाठी त्यांच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. त्यांचे कार्यकर्ते सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करीत होते.
नितेश राणे हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने 4 फेब्रुवारीला रात्री त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सावंतवाडी कारागृहात न ठेवता नितेश राणेंना रुग्णालयात ठेवावे, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी आधीच केला होता. सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे हा अर्ज करण्यात आला होता. राणे यांची प्रकृती बरी नसल्याचे वकिलांनी आधीच न्यायालयाला कळवले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राणेंना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. आता तेथून त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले आहे.
पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राणेंच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर आज होणारी सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नंतर प्रकटले होते आणि काही दिवस कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. नंतर सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते. (Nitesh Rane News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.