Kolhapur News : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असताना कोल्हापूर जिल्ह्यात आता दोन्ही आघाड्यांमधील प्रचाराची लगबग वाढली आहे. शेवटच्या दिवसात प्रचाराची रणधुमाळी आणखी जोर धरणार आहे. महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय पातळीवरील चेहऱ्यांना कोल्हापुरात आणण्याची तयारी उमेदवारांकडून सुरू आहे.
पक्षपातळीवरील नेत्यांना कोल्हापुराच्या मैदानात सभा घेत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. मतदानाला तीन दिवसांचा अवधी असताना महाविकास आघाडीकडून शनिवारी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priynka Gandhi) आणि महायुतीकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोल्हापुरात येणार आहेत.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात कोल्हापुरातील गांधी मैदान येथे प्रियंका गांधी यांची सभा होणार आहे. शनिवारी दुपारी एक वाजता ही सभा होणार असून महाविकास आघाडीचे पुरस्कृत कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर, कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील, करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे.
त्यानिमित्ताने कॉँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. जवळपास हजारो कार्यकर्ते आणि महिला या सभेसाठी उपस्थित राहणार असून त्यासंबंधीचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेस (Congress) नेत्या प्रियांका गांधी यांची सभा झाल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोल्हापुरात येणार आहेत. दुपारी एक वाजता कोल्हापुरातील तपवन मैदान येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर दक्षिणचे अमल महाडिक आणि करवीरचे चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे.
या सभेच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली असून जवळपास लाखो कार्यकर्ते आणि महिला या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. येत्या दोन दिवसात महाविकास आघाडी व महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याने सर्वांचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.