Kolhapur Political : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची प्रचारयंत्रणा आणि अंतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. उमेदवार अदलाबदलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर - हातकणंगलेपैकी एका जागेवर भाजपचा दावा केल्यानंतर शिंदे गटात खळबळ माजली होती.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक यांच्याबाबतीत असलेल्या नाराजीची कुणकुण लागल्यानंतर ही जागा भाजपकडे यावी, यासाठी जोरदार फिल्डिंग भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पातळीवर लावली होती. सध्याच्या घडीला कोल्हापूर लोकसभा हा मतदारसंघ भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे, तर उमेदवार महाडिक घराण्यातीलच असल्याचे बोलले जात आहे.
2019 च्या निवडणुकीत महायुतीतून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता. निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी पहिल्यांदा भगवा फडकावला होता. त्यानंतर शिवसेनेत दुफळी झाल्यानंतर विद्यमान फॉर्मुल्यानुसार कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे राहील, अशी चर्चा सध्या आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दोनपैकी एका मतदारसंघावर दावा केल्यानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत खळबळ माजली होती. वास्तविक पाहता भाजपने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर अधिक प्रयत्न केल्याचे समजते. हातकणंगलेपेक्षा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचे सांगितले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसैनिक आणि जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे, तर जनसंपर्क ठेवण्यात ते अयशस्वी आहेत, असाही ठपका मतदारांनी त्यांच्यावर ठेवला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांच्या व्यक्तिगत अस्तित्वापेक्षा त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीच मदत जास्त झाल्याचे दिसते.
आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्याबाबत घेतलेल्या उघड-उघड भूमिकेमुळेच ते खासदार झाल्याचे सत्य आहे. मात्र खासदार झाल्यानंतर कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशील राहतील, हा समजच राहिला. शिंदे गटातील खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल नाराजी भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून उघड झाल्यानंतर भाजपने या लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
त्याबाबत काही चर्चाही झाल्याचे समजते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा मतदारसंघ भाजपकडे आल्यास भाजपकडून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. किंवा गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनादेखील या लोकसभा मतदारसंघातून लढवण्याची चर्चा आहे.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास त्यांचा पूर्वानुभव त्यांच्या पाठीशी आहे. शिवाय 2014 ते 2019 च्या कार्यकाळात त्यांनी केलेली विकासकामाच्या जोरावर मतदारांचा प्रतिसाद त्यांना राहील. शिवाय भाजप, महाडिक गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेगट हा त्यांच्या पाठीशी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
शौमिका महाडिक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांना महिलावर्गाचा मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तसेच गोकुळ दूध संघाच्यानिमित्ताने त्यांनी जिल्ह्यातील गावागावात सभा घेऊन यापूर्वी संपर्क ठेवलेला आहे. शिवाय धनंजय महाडिक यांची स्वतंत्र ताकद शौमिका महाडिक यांच्या पाठीमागे उभे राहू शकते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे नेते समरजित घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील यांचीही ताकद भाजपच्या बाजूने उभी राहू शकते.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.