
Solapur, 17 May : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अटकेत असलेली संशयित मनीषा मुसळे माने हिच्यावर पोलिसांनी तपास केंद्रीत केला आहे. मात्र, मनीषा मुसळे मानेच्या दाव्यामुळे पोलिसांच्या हाती पुन्हा धुपाटणे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनीषा मुसळे माने हिच्या बॅंक खात्यात तीन वर्षांत आलेले पैसे हे पगारीचे आणि शेती, घर घेण्यासाठी उसने घेतलेले आहेत, असे तिने वकिल प्रशांत नवगिरे यांना सांगितले आहे, त्यामुळे मुसळे मानेच्या दिशेने तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती काय लागणार हे खरा प्रश्न आहे.
मनीषा मुसळे माने (Manisha Musale Mane) हिच्या बॅंक खात्यातील 70 लाख रुपयांच्या दिशेने पोलिसांनी डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचा तपास सुरू केला आहे. पण वळसंगकर हॉस्पिटलचे आर्थिक अधिकार मनीषा मुसळे माने हिला नव्हते. ती हॉस्पिटलमध्ये केवळ प्रशासकीय अधिकारी होती, तिच्या बॅंक खात्यातील पैसे हे शेती आणि घर घेण्यासाठी उसने घेतले आहेत. तसेच पगाराचीही काही रक्कम त्यात आहे, असे मनीषा मुसळे माने हिने आपल्या वकिलांना सांगितले आहे, त्यामुळे या दिशेने सुरू असलेल्या तपासात पोलिसांच्या हाती काय लागणार असा सवाल उपस्थित होत आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर (dr. shirish valsangkar) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिने दोन मुलांना मारून जाळून घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्याला वळसंगकर कुटुंबीय जबाबदार राहील, असा धमकीचा मेल मनीषा मुसळे माने हिने डॉक्टरांना पाठवला होता. त्यानंतर तिने डॉ शिरीष वळसंगकर आणि कुटुंबीयांची माफीही मागितली हेाती.
या प्रकरानंतर डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. त्या मेलचा आधार घेऊन पोलिसांनी मनीषा मुसळे माने हिला अटक केली हेाती. तिला सुरुवातीला पाच दिवसांची पोलिस कोठडी, त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, ती संपल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी आणि त्यानंतर पुन्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मुसळे मानेला मिळाली आहे. पण या चौकशीदरम्यान पोलिसांना ठोस पुराव मिळू शकलेला नाही.
मनीषा मुसळे माने हिच्या बॅंक खात्यात तीन वर्षांत ७० लाख रुपये कोठून आले, याचा तपास पोलिस करीत आहेत. मनीषा मुसळे माने हिला दरमहा एक लाख ८० हजार रुपये पगार होता. तिने घर बांधण्यासाठी तसेच इतर अडचणीच्या वेळी ओळखीच्या लोकांकडून ऊसने पैसे घेतले आहेत. ज्यांच्याकडून मनीषा मुसळे माने हिने ऑनलाईन पैसे घेतले होते, ते त्यांना परतही देण्यात आले आहेत.
मनीषा मुसळे माने हिच्या बॅंक खात्यात आलेल्या रकमेचा हिशेब करून तेवढ्या पैशाबाबत पोलिसांकडून मुद्दा उपस्थित केला आहे. आर्थिक बाबींच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती नेमके काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
मनीषा मुसळे माने हिच्या तीन बॅंक खात्यातील रक्कमेचा तपास करताना पोलिसांनी वळसंगकर हॉस्पिटलमधील पाच जणांना बोलावून समोरासमोर चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान मनीषा मुसळे माने हिने हॉस्पिटलच्या कोणत्याही व्यवहारात आपली सही नाही, असे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे मुसळे माने हिच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे डॉक्टरांनी आत्महत्या केली असेल तर सुसाईड नोटमध्ये त्याचा उल्लेख का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.