

Pune politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला असून, ‘ऑपरेशन टायगर’च्या नव्या टप्प्याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. तळकोकणातून या मोहिमेची सुरुवात होण्याचे संकेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर आता या राजकीय हालचाली पुण्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत असली, तरी भेटीचा नेमका तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
ऑपरेशन टायगरची सुरुवात तळकोकणातून होणार?
राज्यात ‘ऑपरेशन टायगर 3.0’च्या चर्चांना वेग आला असताना, तळकोकणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या नगराध्यक्षांच्या बैठकीला ठाकरे गटाचे स्थानिक नेते आणि कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपस्थिती लावली होती. त्यांच्या या उपस्थितीमुळे राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही ऑपरेशन टायगरबाबत सूचक विधान केल्याने तळकोकणासह राज्यातील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे. आगामी राजकीय मोहिमेची सुरुवात कोकणातून होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.
बाबाजी काळेंच्या सामंत भेटीने राजकीय चर्चांना उधाण
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटातील नेत्यांना पक्षात आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
संदेश पारकरांच्या बैठकीतील उपस्थितीनेही चर्चांना बळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या नगराध्यक्षांच्या बैठकीला ठाकरे गटाचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपस्थिती लावली होती. बैठकीत त्यांनी शहर विकासाच्या प्रश्नांवर सक्रिय भूमिका मांडल्याची चर्चा आहे. त्यांच्या उपस्थितीवरून ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे तर्कही व्यक्त केले जात होते. मात्र, संदेश पारकर यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, यापूर्वीही ते अशा बैठकीला उपस्थित राहिले होते. महाराष्ट्रातील सर्व नगराध्यक्षांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. नगरपालिका क्षेत्रातील प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली. शिंदे यांच्या शिवसेनेच्या मदतीने शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आपण कणकवलीचे नगराध्यक्ष झालो असल्याने शहराच्या विकासासाठी बैठकीला उपस्थित राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उदय सामंतांचे सूचक विधान काय?
‘ऑपरेशन टायगर’बाबत उदय सामंत यांनी यापूर्वी सूचक विधान केले होते. "आता तुम्हीच समजून घ्या," असे म्हणत त्यांनी या मोहिमेवर सध्या भाष्य करणे टाळले होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या या विषयावर बोलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
एकनाथ शिंदे यांची राजकीय रणनीती कधी आणि कशी आकाराला येते, याचा अंदाज सहज बांधता येत नाही, असे सांगताना सामंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराचा संदर्भ दिला होता. ओमराजे निंबाळकर माझ्या बाजूला आहेत; त्यांचे ऑपरेशन कधी झाले, हेही कोणाला कळले नाही, असे विधान त्यांनी केले होते. सामंत यांच्या या विधानानंतर ‘ऑपरेशन टायगर’बाबतच्या चर्चांना अधिक जोर आला. आता बाबाजी काळे यांनी उदय सामंत यांची घेतलेली भेट या चर्चांमध्ये नवा मुद्दा ठरली आहे. मात्र, या भेटीमुळे पक्षांतर होणार की केवळ राजकीय संवाद झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.