

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सर्वसाधारण गटातील 1 हजार 650 मतांची मोजणी पूर्ण झाली असून महायुतीचे उमेदवार 40 ते 50 मतांच्या फरकाने आघाडीवर असल्याचं चित्र आहे. मात्र, क्रॉस व्होटिंग आणि मोठ्या संख्येने बाद झालेली मते यामुळे निकालाचं गणित बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकूण 5 हजार 416 मतांपैकी 200 हून अधिक मते बाद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या बाद मतांचा फटका नेमका कोणाला बसणार आणि त्याचा फायदा कोणाला होणार, याबाबत कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
समविचारी आघाडीचीही जोरदार टक्कर
गोकुळच्या मतमोजणीत सर्वसाधारण गटातील पहिल्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. मात्र, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे अभिजीत तायशेटे आणि शशिकांत चुयेकर हे महायुतीच्या उमेदवारांना कडवी टक्कर देताना दिसत आहेत. मतांमधील तुलनेने कमी फरकामुळे पुढील फेऱ्यांतील मतमोजणी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
विनय कोरे यांच्या प्रभावक्षेत्रात समविचारी आघाडीची मुसंडी
सध्याच्या मतमोजणीच्या चित्रानुसार, काही भागांत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. आमदार विनय कोरे यांच्या प्रभावक्षेत्रात या आघाडीने मुसंडी मारल्याचं चित्र आहे. गगनबावडा, पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यांतील समविचारी आघाडीच्या उमेदवारांची कामगिरीही लक्षवेधी ठरत आहे.
दुसरीकडे, शिरोळ, करवीर, भुदरगड आणि चंदगड तालुक्यांतील मतांची विभागणी समविचारी आघाडीसाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यामुळे तालुकानिहाय मतांचे गणित आणि उमेदवारांना मिळणारा पाठिंबा निकालावर प्रभाव टाकू शकतो.
क्रॉस व्होटिंगमुळे निकालाचं गणित बदलणार?
पहिल्या टप्प्यातील मतमोजणीत महायुतीचे उमेदवार आघाडीवर असले, तरी क्रॉस व्होटिंगच्या चर्चेमुळे निकालाचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. मतदारांनी पक्षीय किंवा आघाडीच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या उमेदवारांना मतदान केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, राखीव गटातील मतमोजणीकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. या गटातून मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र आणि गोकुळचे माजी अध्यक्ष नाविद मुश्रीफ निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राखीव गटातील मतमोजणी आणि त्यातून समोर येणारे कल निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात. एकीकडे महायुतीची आघाडी, दुसरीकडे समविचारी आघाडीची लढत आणि त्यात क्रॉस व्होटिंगची चर्चा, यामुळे गोकुळच्या निवडणुकीचा निकाल अधिकच उत्कंठावर्धक बनला आहे. अंतिम निकालात कोण बाजी मारणार, याकडे आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.