Pune Metro : पुण्याच्या आयटी हबला मोठा दिलासा! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला CMRS चा ‘ग्रीन सिग्नल’, 15 दिवसांत तयारी पूर्ण

Hinjewadi-Shivajinagar Metro Service : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या मार्गिकेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी दिली आहे.
Pune Metro
Pune Metrosarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : पुण्याच्या आयटी हबला थेट शिवाजीनगरशी जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा प्रवासी सेवेसाठीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तब्बल २३ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गिकेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाली असून, उर्वरित तांत्रिक बाबींची पूर्तता येत्या १० ते १५ दिवसांत करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर मेट्रो प्रवासी सेवेसाठी सज्ज होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रवासी सेवा कधी सुरू करायची, याचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार संवादात ही माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यावेळी उपस्थित होत्या. हिंजवडी-माण ते शिवाजीनगर हा सुमारे २३.२०३ किलोमीटरचा उन्नत मेट्रो मार्ग असून, त्यावर एकूण २३ स्थानके आहेत. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या तत्त्वावर राबविला जात आहे. सुरुवातीला माण ते बालेवाडी या टप्प्यात मेट्रो सुरू करण्याचे नियोजन होते.

मात्र, अर्ध्या मार्गावर मेट्रो सुरू केल्यास अपेक्षित प्रवासी प्रतिसाद मिळणार नसल्याने संपूर्ण मार्गिका कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शिवाजीनगर येथे पुणे मेट्रोशी या मार्गाची कनेक्टिव्हिटी होणार असल्याने आयटी पार्क, हिंजवडी, बालेवाडी आणि पुणे शहरातील प्रवाशांसाठी ही मार्गिका महत्त्वाची ठरणार आहे.

Pune Metro
Pune Metro Line 3: 12 रुपयांत प्रवास, पण प्रतीक्षा कायम! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला प्रशासनाचा 8 वा मुहूर्त

१० ते १५ दिवसांत उर्वरित कामे पूर्ण होणार

संपूर्ण मार्गिकेला तसेच १७ स्थानकांना CMRS ची आवश्यक मंजुरी मिळाली आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना CMRS कडून करण्यात आल्या आहेत. ही कामे येत्या १० ते १५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रकल्प सज्ज असेल. मात्र, मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमआरडीएकडून घेतला जाणार नसून, राज्य सरकारच्या पातळीवर त्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पाला मुदतवाढीवर मुदतवाढ

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड कंपनीकडून पीपीपी तत्त्वावर राबविला जात आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्याने कंपनीला यापूर्वी डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

उर्वरित किरकोळ कामे आणि दुरुस्तीसाठी त्यानंतर आणखी तीन महिन्यांचा, म्हणजेच ३१ मार्च २०२७पर्यंतचा कालावधी देण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाच्या विलंबाबाबत संबंधित कंपनीला अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नेमक्या कोणत्या कारणांमुळे कामाला विलंब झाला, याचा शोध घेतला जाईल. त्यानंतर संबंधित कंपनीवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्घाटनाच्या दिवशी तिकीट दर जाहीर होणार

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे तिकीट दर सध्या निश्चित झालेले नाहीत. मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद, फेऱ्यांची संख्या आणि अन्य बाबींचा विचार करून तिकीट दर निश्चित केले जातील. उद्घाटनाच्या दिवशीच तिकीट दर जाहीर करण्यात येतील, अशी माहिती डॉ. चौधरी यांनी दिली. महागाई निर्देशांकाचाही तिकीट दर निश्चित करताना विचार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी ४२६ कोटींचा प्रस्ताव

हिंजवडी परिसरातील मेट्रो स्थानकांपर्यंत आणि तेथून पुढे प्रवाशांना सहज पोहोचता यावे, यासाठी 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी'चा स्वतंत्र प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४२६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यातील ५० टक्के हिस्सा पीएमआरडीए आणि उर्वरित ५० टक्के हिस्सा एमआयडीसी उचलणार आहे.

Pune Metro
Pune Metro: कोट्यवधींचा खर्च अन् पहिल्याच पावसात 'पाण्यात'? पुणे मेट्रोच्या 'छत्रपती संभाजी महाराज' अन् 'स्वारगेट' स्थानकात साचलं पाणी...

हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा प्रश्न लक्षात घेता, मेट्रोसोबत ही जोडणी महत्त्वाची ठरणार आहे. आता मेट्रोची तांत्रिक तयारी पूर्ण होण्याच्या मार्गावर असली, तरी प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनाचा मुहूर्त नेमका कधी ठरतो, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com