Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या 2019 मधील निवडणुकीत मातब्बर धनंजय महाडिक यांचा पराभव करून शिवसेनेचा पहिलावहिला कोल्हापूर लोकसभेचा खासदार म्हणून संजय मंडलिक यांनी मान मिळवला. मंडलिक युतीचे उमेदवार असताना काँग्रेसचे माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील यांनी आघाडीच्या विरोधात शड्डू ठोकून युतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळेच मंडलिक लोकसभेत विजयी झाले होते.
एकीकडे सदाशिवराव मंडलिक यांचा राजकीय विचार व वारसा सोबत असताना राजकीय कारकीर्दीला आकार दिला. पण राज्यातील सध्याचे राजकारण पाहता मंडलिक यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सध्या दोघांनाही एकदिलाने काम करावे लागणार आहे.
मात्र, महाविकास आघाडीचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते आमदार सतेज पाटील यांचे कडवे आव्हान मंडलिक यांच्यासमोर असणार आहे. सतेज पाटलांशी काडीमोड घेतल्यानंतरची यंदाची लोकसभा निवडणूक मंडलिक यांना झेपणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)
संजय सदाशिवराव मंडलिक
13 एप्रिल 1964
एम.ए., बी.एड., पीएचडी.
जिल्ह्याचे लोकनेते सदाशिवराव मंडलिक आणि शिवराज विद्यालयाच्या पहिल्या शिक्षिका विजयमाला मंडलिक यांच्या पोटी 13 एप्रिल 1964 रोजी कोल्हापुरात संजय मंडलिक यांचा जन्म झाला. कार्यकर्त्यांच्या गराड्यात सर्वस्व हरवलेले साहेब आणि त्या कार्यकर्त्यांची मायेने विचारपूस करणाऱ्या विजयमाला मंडलिक यांचे कुटुंब तसे सर्वसामान्यांसारखेच. संजय मंडलिक यांचे बालपण तसे कष्टात गेले. शिवाजी पेठेतील सवंगड्यांत ते अनेक वर्ष रमले.
संजय मंडलिक यांच्या वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांची पाखरमाया संपली. मातृत्वाच्या मायेची सावली दादांसह पाठच्या तीन बहिणींच्या वाट्याला फारशी आली नाही. सदाशिव मंडलिक त्यावेळी 47 वर्षांचे होते. त्यामुळे साहेबांसह त्यांचे जिवाभावाचे कार्यकर्तेच या भावंडांचे आई-वडील बनले. आजही तोच जिव्हाळा मंडलिक कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांत कायम आहे. याच सगळ्या आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर दादांचे शिक्षण पार पडले.
स्वतः शिक्षक, पत्नी शिक्षिका मग माझ्या मुलानेही शिक्षक व्हावे ही साहेबांची मनोवृत्ती. त्याच भूमिकेतून संजय मंडलिक यांची जडणघडण झाली. वैशाली यांच्याशी संजय मंडलिक यांचा विवाह झाला. त्यांच्यापासून त्यांना तीन अपत्ये आहेत. वीरेंद्र, यशोवर्धन आणि समरजित अशी त्यांची नावे आहेत.
राज्यात राजकीय विद्यापीठ म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील कागलची ओळख आहे. तेथील राजकीय घडामोडी या कायमच थक्क करणाऱ्या असतात. ज्याच्या हातात सहकारी संस्था त्याच्या हातात विधानसभा, लोकसभेच्या चाव्या. त्यासाठी खेळले जाणारे गटातटाचे राजकारण, हा तर कोल्हापुरातील संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. यातूनच कोल्हापुरात अनेक मातब्बर राजकीय घराणी निर्माण झाली आहे. यापैकीच एक घराणे म्हणजे मंडलिक घराणे. सामान्य घरात जन्मलेल्या सदाशिवराव मंडलिक यांचा जीवनप्रवास खडतर होता.
अनेक अडचणींवर मात करीत त्यांनी चार वेळा आमदार, चार वेळा खासदार व एकदा पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्रिपद भूषविले होते. कागल पंचायत समितीचे सभापतीपदाने त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 1967 मध्ये जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती, तर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार बनले. 1993 मध्ये पाटबंधारे, शिक्षण या खात्याच्या राज्यमंत्रिपदाचा कारभार त्यांच्याकडे होता. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर मंडलिक यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
1998 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले. सलग तीन वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून संसदेवर निवडून गेले. शरद पवार यांच्यासोबत मतभेद झाल्याने 2009 ची निवडणूक मंडलिक यांनी अपक्ष म्हणून लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढे 2014 मध्ये संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढविली. मात्र त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला
शेती, साखर कारखाना, शिक्षण संस्था
कोल्हापूर
शिवसेना (शिंदे गट)
जिल्हा परिषद व सहकार क्षेत्रातून संजय मंडलिक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. 1998 मध्ये ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष तर 2003 मध्ये कोल्हापूर जिल्हा सरकारी बोर्डाचे अध्यक्ष झाले. 2012 मध्ये संजय मंडलिक कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. यातूनच त्यांनी दिल्लीचे स्वप्न पाहिले. वडिलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. पण 2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला. हा मतदारसंघ काँग्रेसने मागून घ्यावा, यासाठी मंडलिक पिता-पुत्रांनी दिल्लीत तळ ठोकला. मात्र वरिष्ठांनी त्याची दखल घेतली नाही.
अखेर नाराज झालेल्या मंडलिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या विरोधात 2014 ची निवडणूक लढवली. या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना मोदी लाट असूनही राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांच्याकडून 33 हजार 259 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला. कामाशी एकनिष्ठ असणारे खासदार मंडलिक प्रसिद्धीपासून दूरच असतात. त्यामुळे आजपर्यंत त्यांचे वाढदिवसही अत्यंत साधेपणाने साजरे झाले. केंद्रीय स्तरावर त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील अनेक कामे मार्गी लागली आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना जिल्ह्यावर आलेले भीषण महापुराचे संकट असो की कोरोनाच्या रूपाने आलेली जागतिक महामारी असो, सर्वसामान्यांना मोठा आधार देण्याचे काम खासदार संजय मंडलिक यांनी केले. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त असतानाही खासदार संजय मंडलिक यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून आरोग्यसेवेत मोठे काम केले. खऱ्या अर्थाने ते जिल्ह्याचे आरोग्यदूत ठरले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील 2019 ची निवडणूक राज्यात चर्चेची विषय ठरली होती. शिवसेनेचे संजय मंडलिक आणि राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यात निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी महाडिक गटाशी असलेल्या वैरामुळे आघाडी असूनही स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बंड पुकारले होते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा शिवसेनेच्या मंडलिक यांना मिळाला. त्यावेळी सतेज पाटील गटाकडून वापरण्यात आलेली ‘आमचं ठरलंय’ ही टॅगलाईन प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. 2019 च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांना 2 लाख 70 हजार 568 अशा दणदणीत मताधिक्याने मात देत 2014 च्या पराभवाचा वचपा काढला होता.
2019 च्या निवडणुकीत मंडलिक यांच्या विजयामागे सतेज पाटील गटाची ताकद हे प्रमुख कारण होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील गटाशी पत्करलेले वैर हे महाडिकांना महागात पडले. सतेज पाटील गटाने आघाडीच्या विरोधात प्रचार करून संजय मंडलिक यांना साथ दिली. शिवाय राष्ट्रवादीच्या मुश्रीफ यांचाही छुपा पाठिंबा मंडलिक यांच्या मागे राहिला.
दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्यापासूनच या घराण्याचा मतदारापर्यंत संपर्क कमीच आहे. ते संजय मंडलिक यांच्या रूपाने देखील प्रकर्षाने जाणवत आहे. जनमानसात कमी मिसळत असल्याने आजही ग्रामीण भागात कोल्हापूरचा खासदार मी आहे, अशी ओळख संजय मंडलिक यांना सांगावी लागते. मराठा आरक्षणादरम्यान झालेल्या आंदोलनात ग्रामस्थांनी मंडलिक यांची गाडी अडवून केवळ निवडणुकीसाठीच आमच्या दारात येता का, असा सवाल उपस्थित केला होता.
संजय मंडलिक हे सुरुवातीपासूनच प्रसिद्धीपासून अलिप्त आहेत. मात्र दोन वर्षांपासून त्यांनी समाज माध्यमांची जोड हाताशी धरली आहे. आपल्या कार्याबाबत त्यांनी समाज माध्यमांतून जनसंपर्क ठेवलेला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी भाषणात त्यांचे नाव घेताना मंडलिक अडखळले होते. त्यावरून त्यांच्यावर जिल्ह्यात टीकेचा वर्षाव सुरू होता.
वडील सदाशिवराव मंडलिक
मंडलिक हे शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व आहेत. विरोधकांबाबत त्यांचे विचार पूर्वग्रहदूषित नसतात. मैत्री जपण्याची त्यांची एक विलक्षण हातोटी आहे. मैत्रीला नि:स्वार्थपणे जागणारा एक उत्तम मित्र, अशी त्यांची ओळख आहे.
खासदार मंडलिक थेट जनतेच्या संपर्कात कमीच असतात. प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे दुर्लक्ष करतात. राजकीय डावपेच ओळखण्यात ते कमी पडतात. मतदारसंघाशी त्यांचा संबंध निवडणुकीपुरताच असतो, असे आरोप त्यांच्यावर होत असतात. धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करवून घेतला, कामे केली. मंडलिक मात्र केंद्रीय स्तरातून प्रकल्प आणण्यास कमी पडले.
सध्याच्या घडीला महायुतीकडे संजय मंडलिक यांच्याशिवाय पर्याय नाही. धनंजय महाडिक यांना उमेदवारी द्यायची झाल्यास निवडून आल्यानंतर त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यावा लागेल. संजय मंडलिक यांना उमेदवारी न मिळाल्यास त्याचा फारसा परिणाम महायुतीवर होणार नाही. शिवसेनेतून त्यांनी शिंदे गटात गेल्यानंतर मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी आहे. ही नाराजी येत्या लोकसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. त्यांना उमेदवारी नाकारल्यास केवळ मंडलिक छुप्या पद्धतीने गट युतीच्या विरोधात राहू शकतो, अशी शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.