

- सचिन शिंदे
Krishna Sugar Factory Election: रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भोसले गटाने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. यामागे भोसले गटाने केलेले बेरजेचे राजकारण पथ्यावर पडल्याचे दिसून येते. कऱ्हाडमधून उंडाळकर गट, डॉ. इंद्रजित मोहितेंचा पाठिंबा, वाळव्यातून जयंत पाटील, महाडिक गटाची मिळालेली साथ, कडेगाव तालुक्यातून आमदार विश्वजित कदम यांच्या पाठिंब्यामुळे निवडणुकीचे चित्रच पालटले.
निवडणुकीपूर्वी सत्तांतराच्या रंगलेल्या चर्चा, विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. मात्र भोसलेंच्या बेरजेच्या राजकारणाने आणि यशस्वी डावपेचांमुळे टीकेची झोड फोल ठरली. प्रत्यक्ष सभासदांनी मात्र भोसलेंच्या बाजूने दिलेल्या कौलामुळे २१- ० च्या फरकाने विजय मिळवत भोसलेंनी सत्तेची हॅट्ट्रिक साधली. कृष्णा कारखान्याच्या सत्ताकारणात विरोधकांचा प्रभाव चर्चेपुरताच मर्यादित राहिला.
मताधिक्याचा उच्चांक
प्रचारावेळी सत्ताधारी भोसले गटाने आक्रमक, नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली. कारखान्याची आर्थिक स्थिती, विकासकामे, ऊस उत्पादकांना दिलेल्या सुविधा आणि भविष्यातील प्रकल्पांचा प्रभावीपणे प्रचार केला. त्यावेळी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याची रणनीती भोसले गटाने यशस्वीपणे राबवली. त्यामुळे विरोधकांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांचा प्रभाव मतदानावर पडल्याचे दिसत नाही.
भोसले गटाने गेल्या ११ वर्षांच्या पारदर्शक व बक्षीसपात्र कारभाराचा भक्कम पाया मतदारांसमोर ठेवला. ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळालेला समाधानकारक दर, कारखान्याची वाढलेली आर्थिक शिस्त आणि राष्ट्रीय पातळीवर मिळालेले पुरस्कार ही भोसले गटाची जमेची बाजू होती. ज्याला विरोधकांचे कोणतेही आरोप छेद देऊ शकले नाहीत.
ऐतिहासिक मताधिक्यामुळे सभासदांचा विश्वास भाेसलेंच्या नेतृत्वावर कायम असल्याचे स्पष्ट झाले. संघटनात्मक ताकदच नव्हे, तर सभासदांशी असलेला संपर्क व कारखान्याच्या कामकाजाबाबत निर्माण झालेला विश्वासाचा फायदा भोसलेंना झाल्याचेही निकालात दिसून येतो. अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाने संयुक्त मताधिक्याचा नवा उच्चांक प्रस्थापित करत कारखान्यात एकहाती सत्ता राखली.
राजकीय मैत्रीतील प्रगल्भतेला पसंती
कऱ्हाड, वाळवा आणि कडेगाव या तालुक्यांत भोसले गटाच्या विजयाचा खरा गाभा आहे. या तालुक्यातून भोसलेंनी राजकीय समीकरण जुळवले. त्यातूनच विजयाची वाटचाल सुकर झाली. आमदार डॉ. भोसले यांनी केवळ कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता, जिल्हा बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अचूक वेध घेत मोठी राजकीय बेरीज केली.
यात सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरली ती म्हणजे, उंडाळकर गटासोबत केलेली तडजोड. उंडाळकर गटाला सन्मानाने सोबत घेतल्यामुळे विरोधकांच्या मनसुब्यांना मोठा सुरुंग लागला. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी दिलेला पाठिंबा, तसेच त्यांना सोबत घेण्याच्या रणनीतीमुळे कृष्णाकाठच्या जुन्या जाणत्या आणि निष्ठावंत मतदारांनी भोसलेंच्या बाजूने एकमुखाने कौल दिला.
वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची मिळालेली साथ व कडेगाव तालुक्यातून काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्याशी केलेली प्रगल्भ राजकीय मैत्री, ही निवडणुकीला कलाटणी देणारी ठरली. महाडिक गटानेही त्यांची ताकद भोसलेंच्या मागे उभी केल्याने हा लढा सर्वसमावेशक बनला. त्या गणितांमुळे विरोधकांचे संघटन पुरते विस्कळित झाले.
विरोधकांकडे मुद्द्यांचा अभाव
निवडणुकीच्या निकालामुळे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वासाची घट्ट मोहर उमटवल्याचेही स्पष्ट झाले. वाढलेले मताधिक्य त्यावरच शिक्कामोर्तब करते. विरोधकांकडे ठोस मुद्द्यांचा अभाव होता. भोसले गटाने मात्र काम, पारदर्शकता आणि प्रगल्भ तडजोडी अशी त्रिसूत्रीच्या जोरावर निवडणुकीवर सुरुवातीपासूनच एकतर्फी पकड ठेवली. विरोधी गटाने निवडणुकीत लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मतदारांपर्यंत भूमिका अपेक्षित प्रभावीपणे पोहोचवता न आल्याने त्यांना यश आले नाही. निकालानंतर विरोधकांवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. सत्ताधाऱ्यांवरील विश्वास कायम असला, तरी त्यांच्या खांद्यावर अधिक जबाबदारीही आली आहे. सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करताना पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि विकासाची गती कायम राखावी लागणार आहे.
विजयाची कारणे
१. जिल्हा बँक अन् भविष्यातील राजकीय नियोजनाने विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम
२. उंडाळकर गटाला सोबत घेत मास्टरस्ट्रोक तडजोड
३. रयत संघर्ष मंचाचे डॉ. इंद्रजित मोहिते यांचा पाठिंब्याने वाढली ताकद
४. कडेगाव तालुक्यातील अनपेक्षित मैत्रीचा पॅटर्न
५. वाळव्यात जयंत पाटील यांची मिळालेली साथ
६. वाळव्यातील महाडिक गटाचा पाठिंबा ठरला महत्त्वाचा
७. भोसले गटाचा ११ वर्षांचा पारदर्शक व स्वच्छ कारभाराचा प्रभाव
८. कृष्णा कारखान्याची ऊस दर, व्यवस्थापनाची बक्षीसपात्र वाटचालही प्रभावी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.