

Satara Political News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सर्वकाही आलबेल नाही. सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. आमदार महेश शिंदे यांनी थेट पालकमंत्री व पक्षातील ज्येष्ठ नेते शंभूराज देसाई यांनाच उघडपणे आव्हान दिले आहे. देसाई आपल्याला पहिल्यापासूनच वेगळी वागणूक देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी शिवसेनेच्या जिल्ह्यातील अस्तित्वाबाबतही भाष्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील सभेला जाणार नसल्याचे महेश शिंदे यांनी जाहीर केले आहे. आपल्याला बोलविण्यात आले नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यावरून त्यांनी थेट देसाईंकडे बोट दाखविले आहे. देसाई एकटेच निर्णय घेतात. मला कार्य़क्रमांना बोलविले जात नाही. जिल्ह्यात शिवसैनिक कुठे आहेत, असा सवालही महेश शिंदे यांनी केला होता. तसेच 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळे शिवसेनेच्या चिन्हावर मी लढलो, असेही शिंदे म्हणाले आहेत.
महेश शिंदे यांचे आरोप आणि विधानांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मीडियाशी बोलताना सामंत म्हणाले, शंभूराज देसाई हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते सिनिअर मंत्री आहेत. ते कुणालाही डावलून काम करत नाहीत. आज गांधी मैदानात रेकॉर्ड ब्रेक सभा होईल. त्यानंतर काही लोकांना शिवसेना आहे की नाही हे कळेल.
मी कुणाचेही नाव घेणार नाही, पण शिंदे साहेबांना आव्हान देणारे कसे मातीमोल झाले हे तुम्हालाही माहिती आहे. ज्यांना साहेबांनी मोठं केलंय त्यांनी तर आव्हान देऊच नये, असे थेट इशाराच सामंतांनी महेश शिंदे यांचे नाव न घेता दिला. यावरून आता महेश शिंदे यांच्याविरोधातील नाराजी पक्षात प्रचंड वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याआधीच पक्षांतर्गत धुसफूस समोर आली आहे.त्यामुळे आता एकनाथ शिंदे त्यावर आजच्या सभेत बोलणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. या निवडणुकीवेळी मोठा राडा झाला होता. त्यानंतरच महेश शिंदे यांनी देसाईंमधील दुरावा प्रचंड वाढल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.