

Manchar Milk Adulteration Case News : दिसायला पांढरेशुभ्र दूध, मात्र, ते खरे नव्हेच. तर ते होते घातक रसायनांपासून तयार केलेले कृत्रिम व भेसळयुक्त सफेद द्रावण. त्यामध्ये डिटर्जंट, शाम्पू, खाद्यतेल, व्हे पावडर व इतर पदार्थांचा वापर करण्यात आला होता. जुलै महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंचर येथे कृत्रिम व भेसळयुक्त दुधाचे रॅकेट उघडकीस आणले. मात्र, त्याची व्याप्ती केवळ मंचरपुरती न राहता हे दूध इंदापूर व सोलापुरातील माळशिरस येथील सोनाईसह बड्या दूध डेअऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याची साखळीच ‘एफडीए’ने तपासादरम्यान उघडकीस आणली आहे.
पूर्वी दुधात फार-फार तर पाण्याची भेसळ व्हायची. मात्र, आता त्याची जागा घातक रसायनांनी घेतली आहे. मंचर हे याचे केंद्रबिंदू आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ४ जुलैला ‘एफडीए’ आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील नवकार डिस्ट्रीब्यूटर्स येथून व्हे पावडर, व्हे परमिएट पावडर, डिटर्जंट, इमल्सिफायर आदी पदार्थ जप्त केले. विविध कंपन्यांच्या नावाने असलेल्या पावडर आणि भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे नमुने घेऊन साठाही जप्त करण्यात आला.
घातक पदार्थांचा वापर
पुढील चौकशीत दूध भेसळीची पद्धतही समोर आली. दुधातील एसएनएफ वाढविण्यासाठी स्किम्ड मिल्क पावडर, प्रथिनांशी संबंधित घटक वाढविण्यासाठी व्हे पावडर, फॅट वाढविण्यासाठी खाद्यतेल, तर विविध घटकांचे मिश्रण करण्यासाठी इमल्सिफायर आणि डिटर्जंटचा वापर केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर मंचर येथील आकाश डेअरी फार्मच्या सहा नमुन्यांमध्ये डिटर्जंट आढळले. तसेच, अथर्व मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट इंडस्ट्रीजच्या दुधातही डिटर्जंट आढळले.
सुशांत हिंगे मास्टरमाइंड
मंचर येथील दूध भेसळीचा मास्टरमाइंड सुशांत बबनराव हिंगे हा असल्याचे तपासात समोर आले आहे. तपासात उघडकीस आलेल्या साखळीनुसार, हिंगे हा पिलीव (माळशिरस, सोलापूर) येथील सोनू ऊर्फ चैतन्य अरुण घोरपडे याला या दुधाचा पुरवठा करायचा. पुढे हेच भेसळयुक्त दूध पिलीव, माळशिरस येथील महालक्ष्मी मिल्क अँड प्रोडक्ट्स, योगीनाथा मिल्क सप्लायर्स आणि पुढे गोखळी, इंदापूर येथील सोनाई डेअरी (इंदापूर डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट्स)पर्यंत टँकरद्वारे पोहोचत होते.
तसेच, सोनाई डेअरीला होळेवाडी, ता. खेड येथील अवजा दूध संकलन केंद्रातून आनंदा मारुती पवार हा भेसळयुक्त दूध पोहोचवत होता. तो मुख्य आरोपी सुशांत हिंगेच्या संपर्कात होता.
३७ आरोपी निष्पन्न
मंचर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आतापर्यंत ३७ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यात भेसळ द्रव्यांचे पुरवठादार, औद्योगिक रसायनांचे पुरवठादार, वाहतूकदार, दूध संकलन व शीतकरण केंद्रांशी संबंधित व्यक्ती आणि दूध व्यावसायिकांचा समावेश आहे. यापैकी २५ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, तर १२ जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
‘‘दूध हा बालके, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातील महत्त्वाचा अन्नपदार्थ आहे. या तपासात भेसळयुक्त दूध नेमके कुठे सापडले, यापुरता तपास मर्यादित न ठेवता भेसळीसाठी वापरलेले पदार्थ कोणी पुरविले, कोणी खरेदी केले, त्यांचा वापर कुठे झाला, कोठे गेले, याचा माग काढला जात आहे. या साखळीतील मोठ्या आर्थिक व्यवहारांची आणि डिजिटल पुराव्यांचीही माहिती प्रशासनाच्या हाती लागली असून, स्वतंत्र आर्थिक तपास सुरू आहे.’’
— तुकाराम मुंढे, आयुक्त, एफडीए
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.