Ahmednagar Politics : 'गणेश'च्या पराभवानंतर विरोधकांना दिलेल्या शुभेच्छांमध्ये राधाकृष्ण विखेंच्या अनेक राजकीय खेळ्या...

Radhakrushna Vikhe Patil : "राजकारण करत सत्तेचा सारीपाट याच सहकारातून महाराष्ट्राने पहिला आहे."
Ahmednagar Politics :
Ahmednagar Politics :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : आपल्या राज्याला सहकाराची मोठी परंपरा आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवत ग्रामीण भागाचा विकास, अर्थकारण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समाजकारण, राजकारण करत सत्तेचा सारीपाट याच सहकारातून महाराष्ट्राने पहिला आहे. विशेष म्हणजे नुकतीच ज्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आणि राज्यभर गाजली ती याच सहकारी साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातली आहे. विशेष म्हणजे प्रवरेच्या खोऱ्यात पद्मश्री दिवंगत डॉ. विठ्ठलराव विखे यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना सोबत घेत उभारला त्याच कारखान्या परिसरातील आहे. (Latest Marathi News)

गणेश सहकारी कारखाना राहाता तालुक्यात असून, आर्थिक स्थिती खराब झाल्याने आठ वर्षे गणेश कारखाना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा कारखान्यानेच चालवला. मात्र असे असले तरी जो गणेश कारखाना आर्थिक अडचणीमुळे बंद पडण्याच्या अथवा खाजगी कारखानदाराकडे जाण्याच्या स्थितीत असताना राधाकृष्ण विखेंनी कारखाना 2011 ला प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून चालवण्यास घेतला. 20 लाख ऊसगाळप कार्य कारखान्याने करून दाखवला, त्याच विखेंना नुकत्याच पार पडलेल्या गणेश कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत 18 विरुद्ध केवळ एक असा दारुण पराभव का स्वीकारावा लागला? हा विषय सध्या चर्चेत आहे.

Ahmednagar Politics :
Vivek Kolhe News : 'गणेश'च्या निवडणुकीत किंगमेकर ठरले विवेक कोल्हे; थोरातांच्या मदतीने विखे पाटलांचा गड केला खालसा!

वास्तविक 1956 साली स्थापन झालेला श्री गणेश सहकारी साखर कारखाना हा स्थापनेवेळी कोपरगाव तालुक्यात होता. साहजिकच सहकाराच्या जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील तत्कालीन मात्तबर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे आणि शंकरराव काळे या "काळे-कोल्हे" यांच्या भोवतीच सत्तेच्या राजकारणात फिरत राहिला. मात्र त्यात शंकरराव कोल्हे यांच्या ताब्यात हा कारखाना अनेक वर्षे राहिला. बाळासाहेब विखे यांनी गणेशच्या सत्तेत येण्यासाठी आण्णासाहेब म्हस्के यांच्या माध्यमातून केलेला प्रयत्नांना यश आले नाही.

प्रवरा-गोदावरी परिसरात नेतृत्व करत असलेल्या पुढाऱ्यांचे स्वतःच्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या प्रभुत्वाखाली कारखाने असल्याने 'श्री गणेश सहकारी साखर कारखान्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले असेच म्हणावे लागेल. यातून गणेश कारखान्यावर एकहाती वर्चस्व नसणे, कार्यक्षेत्रात कमी ऊस किंवा ऊस वाढी साठी झालेले दुर्लक्ष यातून कारखाना आर्थिक अडचणीत आला.

तत्कालीन परीस्थितीत कोल्हे यांनी जमेल तसा हा कारखाना कार्यरत ठेवला, याला त्याकाळी 'कोल्हे पॅटर्न' असेही नाव पडले. मात्र 2011 साली गणेश कारखान्याची आर्थिक परस्थिती इतकी बिघडली की, कारखाना बंद करणे अथवा खाजगी व्यावसायिकाला विकणे किंवा चालवण्यास देणे असे दोनच पर्याय उरले होते. या परिस्थितीत राधाकृष्ण विखे यांनी आपल्या'प्रवरा साखर कारखाना' या माध्यमातून गणेश कारखाना चालवण्यास घेतला. नुकताच करार संपत असताना सहकार आयुक्त कार्यालयाने त्यांना पुढील पाच वर्षांसाठी कारखाना चालवण्यास परवानगी दिली. तर संचालक मंडळाची मुदत संपल्याने पंचवार्षिक निवडणूक घोषित केली.

Ahmednagar Politics :
Ahmednagar Politics : विखे पाटील यांना जाणीवपूर्वक 'लक्ष्य' केले जातेय का? मतदारसंघात 'गणेश'च्या पराभवानंतर चर्चा सुरू..

एकूणच अशा परस्थिती झालेल्या गणेश कारखान्याची निवडणूक गाजली ती विखे विरुद्ध कोल्हे-थोरात यांच्या पॅनेलने निवडणूक जिंकण्यासाठी केलेल्या अभूतपूर्व प्रयत्नामुळे. मात्र यात सरशी ठरली ती कोल्हे-थोरात गटाची. आणि त्यांच्या पॅनेलने कधी कोपरगाव तालुक्यात असलेला कारखाना आता महसूलमंत्री विखे यांच्या राहाता तालुक्यात आलेला असताना केलेल्या पराभवाने ही निवडणूक गाजली.

राज्यभर गाजलेल्या गणेश करखाण्याच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आता एकूणच चर्चा सुरू झाली आहे ती निवडणुकीत नेमके जिंकले कोण आणि हरले कोण? त्याच बरोबर थोरातांनी थेट भाजपच्याच विवेक कोल्हे यांना साथ देत निवडणुकीत लक्ष घालून राधाकृष्ण विखे यांच्या प्रवरा-लोणीच्या साम्राज्यावर चढाई केलीय का? विखे परिवार भाजप मध्ये असताना गणेश कारखान्याच्या आडून विखेंना पक्षातून वरिष्ठ नेत्यांकडून शह दिला जात आहे का? आणि गणेश कारखाण्याच्या दारुण पराभवणानंतर विखे येणाऱ्या परस्थितीत काय भूमिका घेणार याबद्दल आता मोठा उहापोह सुरू झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात विशेष करून उत्तर नगर जिल्ह्यात पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्ती अर्थात नेता हा नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. पिचड, थोरात, विखे, काळे, कोल्हे, गडाख, ससाणे, मुरकुटे ही मोठी राजकीय घराणी आहेत. ही नेते मंडळी हाच आमचा पक्ष, असा ठाम विश्वास असणारी या नेत्यांची मोठी कार्यकर्त्यांची फळी गावागावात आहे.

Ahmednagar Politics :
Vikhe Patil News: गणेश कारखाना नव्या संचालक मंडळानेच चालवावा; सभासदांचा कौल विखे पाटलांनी केला मान्य

सहकाराच्या मूलमंत्रात बांधलेली नेत्यांची ही फळी एखाद्या निवडणुकीत पराभव झाला तरी खचून न जाता पुढील निवडणुकीत एकजूट करत नेता हाच पक्ष या तंत्राने निवडून आनते हा इतिहास आहे. त्यामुळे गणेश कारखान्याचा दारुण पराभव हा विरोधकांसाठी प्रचाराचा मुद्दा बनणार असला तरी त्यातून विखेंच्या साम्राज्याला सुरुंग लागेल असे अजिबात नाही असा व्होरा राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. तालुका,परिसर, जिल्ह्यावर वर्चस्व राखण्याचा हा जिल्ह्याचे कारभारी म्हणून ओळखले जाणारे विखे-थोरात यांच्यातील ही लढाई केवळ एकमेकांवर नियंत्रण ठेवण्यासाठीही खेळी असल्याचेही बोलले जाते.

1956 साली तत्कालीन कोपरगाव तालुक्यात सहकार तत्त्वावर स्थापन झालेला गणेश कारखाना नेहमीच कोल्हेंच्या ताब्यात वर्षेनुवर्षं राहिला. विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत कारखाना जरी राहाता तालुक्यात आला तरी 8 हजारावर सभासद असलेल्या कारखान्यातील बहुतांशी सभासद हे कोपरगाव तालुक्यातील 11 गावातील आहेत. साहजिकच गणेश कारखान्यावर कोपरगाव आणि कोल्हे यांचेच वर्चस्व राहिले.

Ahmednagar Politics :
Vikhe Patil News: गणेश कारखाना नव्या संचालक मंडळानेच चालवावा; सभासदांचा कौल विखे पाटलांनी केला मान्य

मात्र आठ वर्षांपूर्वी कारखाना आर्थिक अडचणीत आला आणि तो राधाकृष्ण विखे यांनी आपल्या प्रवरा सहकारी करखानाच्या माध्यमातून चालवण्यास घेतला. अडचणीच्या काळात विखेंनी फायदा-तोटा न पाहता कारखाना चालवण्यास घेत जगवला. असे असले तरी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसाचा दर हा नेहमी कमीच राहिला. संजीवनी, संगमनेर आणि प्रवरा आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देत असलेला भाव गणेश कारखान्याला देऊ शकले नाहीत असा आरोप होत नाराजी होती. त्यात विखे यांच्या माध्यमातून परिसरात सभासदांवर हुकूमशाही, एकाधिकारशाहीचा आरोप विरोधकांनी उचलून धरला. त्यात कोल्हे-थोरातांनी कोल्हेंच्या 'संजीवनी' आणि थोरातांच्या 'संगमनेर'चे वैभव निवडणुकीत मतदार सभासदांच्या समोर मांडत हुकूमशाहितुन बाहेर पडून स्वतः कारखाना चालवा असे केलेले आवाहन सभासदांना भावले आणि गणेश कारखाना विखेंच्या हातातून गेला.

पुढील पाच वर्षांचा नवीन करार सहकार आयुक्त विभागाने विखेंकडे असताना आता गणेशच्या निकालानंतर काय हा प्रश्न थोरात-कोल्हें समोर होता. मात्र राधाकृष्ण विखे यांनी गणेशचा पराभव मान्य करत दुसरी कडे अधिकार असताना नवीन करार बाजूला करत नूतन संचालक मंडळानेच कारखाना चालवावा, आमच्या शुभेच्छा आणि सहकार्य राहील अशी भूमिका घेतली हे विशेष. विखेंनी घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेचे आता विश्लेषण केले जात असून यात गणेश मुळे गमावलेली सहानुभूती परत मिळवणे, कारखान्याच्या कार्यक्षेत्रामुळे प्रत्येक्षात आपल्या राहाता मतदारसंघात परिणाम होणार नसला तरी विरोधकांच्या प्रचाराला आवर घालणे आणि महत्वाचे म्हणजे आर्थिक अडचणीत असलेला गणेश कारखाना चालवण्याचे कसब सत्ता नसताना कोल्हे-थोरात कसे पार पाडतात यावर लक्ष ठेवणे हे आहे.

Ahmednagar Politics :
Ganesh Sugar Factory: गणेश कारखान्याच्या अध्यक्षपदी सुधीर लहारे तर उपाध्यक्षपदी दंडवते

अर्थात आता कोल्हे यांना आपल्या नेतृत्वाखाली कारखाना चालवताना आणि पूर्ण क्षमतेने गाळप करत चांगला भाव देऊन सभासदांचा विश्वास संपादन करावा लागणार आहेत. मात्र यात शासन दरबारी येणाऱ्या अनंत अडचणींना कोल्हे कुणाची मदत घेऊन सामोरे जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत. अर्थात विखे यात आपली राजकीय भूमिका भविष्यातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून पार पाडताना राजकीय आखड्यातील गोळा-बेरजेचा हिशोब घेणार हे नक्कीच.

एकंदरीत थोरात-विखेंचे पारंपरिक राजीकय शत्रुत्व यात 2019 ला कोपरगाव मधून भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा झालेला पराभव आणि यात विखेंची भूमिका या त्रिमिती'तुन गणेश निवडणुकीच्या माध्यमातून कोल्हे-थोरात यांनी विखेंना शह दिलेला आहे आणि विजयही मिळवला आहे. यात भाजपात असूनही कोल्हे यांनी भाजपताच असलेल्या आणि जिल्ह्याचे पालक आणि महसूलमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखेंच्या विरोधात ठोकलेल्या शड्डूला ताकत राज्यपातळीवर पण होती का हा विषय पण चर्चेत आहे. या परस्थितीत विखेंनी कायदेशीर अधिकार असताना गणेश कारखाना पराभव मान्य करत कोल्हेंच्या संचालक मंडळाच्या चालवण्यास देत दिलेल्या शुभेच्छात बऱ्याच गोष्टी दडलेल्या असून त्याचा उलगडा 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दरम्यानच होऊ शकणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.