Kolhapur Political News : मनोज जरांगे पाटील यांच्या सभेवरून मंत्री छगन भुजबळ यांनी काही प्रश्न उपस्थित केले. यानंतर जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भुजबळांनी ओबीसी आणि मराठा या दोन समाजांविषयी केलेल्या विधानांमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.
यातून भुजबळांचा ठीकठिकाणी निषेध केला जात आहे. कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाकडून शुक्रवारी भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळे फासून निषेध व्यक्त केला. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. (Latest Political News)
सकल मराठा समाजाने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सहाशे कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप असणाऱ्या मंत्री भुजबळांनी जरांगे पाटील यांच्या सभेची माहिती विचारणे चुकीचे आहे. मंत्री होताना त्यांनी राज्यघटनेच्या अधीन राहून शपथ घेतली आहे.
भुजबळ हे दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूनेच अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोप मराठा समाजाच्या वतीने या वेळी करण्यात आला. त्यामुळे भुजबळांची हकालपट्टी करून त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली.
दरम्यान, जरांगे पाटलांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. त्यावर सरकारच्या वतीने काम सुरू करण्यात आले आहे. यास ओबीसी समाजाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. यावरूनही जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात वारंवार खडाजंगी होताना दिसत आहे. आताही भुजबळांनी सभांबाबत विचारणा केली असता, जरांगेनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
मंत्री छगन भुजबळ यांनी अंतरवाली येथे झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचा खर्च विचारल्यानंतर त्या विधानावरून मराठा समाज आक्रमक झाला होता. तसेच जरांगे पाटील हे मराठा समाजाला एकत्र करू पाहतात. ओबीसी समाजालादेखील आम्ही एकत्र करून न्याय मागू, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली होती. त्यावर जरांगे पाटील यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे.
जरांगे पाटील म्हणाले, "भुजबळांना आम्ही ज्येष्ठ मानत होतो. मराठ्यांनी त्यांना मोठे केले आहे. मात्र, ते आता चिल्लर माणसासारखे वागतात. छगन भुजबळ चिल्लर चाळे सुरू करायला लागले आहेत. त्यांना हवे असेल तर एक-दोन हजार रुपये डिझेलला देतो. त्यांनी अंतरवाली सराटीत येऊन पाहणी करावी," असा टोलाही जरांगेंनी भुजबळांना लगावला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.