

Solapur, 04 June : सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांंचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या युतीने उधळून लावले आहे. गेली दोन दिवसांपासून सोलापुरात तळ ठाकूनही विधान परिषदेची निवडणूक अखेर लागली असून भाजपचे राजेंद्र राऊत यांना पवारांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचे आव्हान असणार आहे.
विधान परिषदेच्या सोलापूर (Solapur) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी छाननीनंतर सात उमेदवार रिंगणात होते. त्यात भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर, आमदार दिलीप सोपल समर्थक नागेश अक्कलकोटे, शिवसेनेचे महेश साठे, रमेश बारसकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धनजंय डिकोळे यांचा समावेश होता.
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद होताच धैर्यशील मोहिते पाटील (Dhiryasheel Mohite Patil) यांनी विरोधकांच्या रणनीतीची सूत्रे होती घेतली. त्यांनी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्याशी चर्चा करून निवडणूक निकराने लढविण्याचा निर्णय घेतला. एकास एक उमेदवार देण्यासाठी इतरांनी माघार घ्यावी, असे उत्तम जानकरांच्या बंगल्यावर ठरविण्यात आले. मोहिते पाटील-सोपल जोडीने निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ द्यायची नाही, असा चंगच बांधल्याचे दिसून आले.
दुसरीकडे, पालकमंत्री जयकुमार गोरे हे कालपासून सोलापुरात तळ ठाकून होते. विरोधकांकडे संख्याबळ अत्यंत तोकडे आहे, त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करावी, अशी त्यांची पहिल्या दिवसांपासून मनीषा होती. त्यासाठी ते सूत्रे हलवत होते. राजेंद्र राऊत यांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी पालकमंत्री गोरे यांनी सर्वच प्रकारची फिल्डिंग लावली होती.
माघारीच्या शेवटच्या दिवशी महायुतीमधील शिवसेनेचे महेश साठे, रमेश बारसकर यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या रणनीतीनुसार जीवन गोरे, नागेश अक्कलकोटे आणि कुर्डूवाडीचे माजी नगराध्यक्ष धनंजय डिकोळे यांनी माघार घेतली. त्यामुळे सोलापूरची निवडणूक बिनविरोध होते की काय, अशी परिस्थिती निर्माझ झाली होती. मात्र, मोहिते पाटील-सोपल युतीने निवडणूक बिनविरोध होण्याचे सर्व प्रयत्न असफल ठरवले.
एकास एक लढत
महायुतीमधील शिवसेनेचे महेश साठे, रमेश बारसकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धनंजय डिकोळे, नागेश अक्कलकोटे, तर आमदार जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांनी माघार घेतली. त्यामुळे सोलापुरात आता भाजप विरुद्ध मोहिते पाटील समर्थक देशमुख अशी एकास एक लढत होणार आहे. भाजप आणि महायुतीकडे बहुमताचा आकडा मोठा असली तर सर्वपक्षीय विरोधक भाजपला जोरदार टक्कर देण्याच्या मनस्थितीत आहेत.
भाजपचे पारडे जड
वसंतराव देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून ते पंढरपूर कासेगावचे रहिवासी आहेत. त्यामुळे विधान परिषदेसाठी सोलापुरात बार्शी विरुद्ध पंढरपूर अशीच लढत होणार आहे, त्यात भाजपचे पारडे जड आहे.
देशमुख-गोरे भेट
दरम्यान, उमेदवार वसंतराव देशमुख आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूरमधील एका हॉटेलमधील भेट झाली. पण, त्या भेटीचा तपशील समजू शकला नाही. मात्र, त्यातून बिनविरोध निवडीसाठी तोडगा निघू शकला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.