

Solapur, 09 June : विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांना महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांनी आव्हान दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवसेनेच्या खासदार प्रा. ज्योती वाघमारे यांची भेट घेतली, त्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या भेटीनंतर खासदार वाघमारे यांनी मोठा दावा केला आहे.
विधान परिषदेच्या मैदानात राजेंद्र राऊत आणि वसंतराव देशमुख हे एकमेकांसमोर उभे ठाकले असली तरी खरी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite-Patil) आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात असल्याचे दिसून येत आहे. दोघांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे, त्यामुळे अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहेत.
धैर्यशील माेहिते पाटील हे गेली दोन दिवसांपासून भाजप-शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. विशेष म्हणजे होटगी मठाचे काशी जगदगुरु डॉ मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामी यांची भेट घेतली होती, त्यामुळे मोहिते पाटील यांनी लिंगायत समाजातील नाराज मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न चालवला आहे.
भाजप नेत्यांच्या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवसेना खासदार प्रा. ज्योती वाघमारे (MP Jyoti Waghmare) यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, उमेदवार वसंतराव देशमुखही उपस्थित होते. त्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. पण त्या भेटीनंतर प्रा. वाघमारे यांनी तातडीने मोठा दावा केला आहे.
मोहिते पाटील यांच्या भेटीबाबत ज्योती वाघमारे म्हणाल्या, मी माझ्या संपर्क कार्यालयात बसून जनतेच्या अडीअडचणी समजून घेत होते. त्या वेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, काँग्रेसचे चेतन नरोटे, महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख भेटीसाठी आले होते. भारतीय संस्कृती आपल्याला अतिथी देवो भवः असे सांगते. त्यानुसार मी आमचा धर्म आणि संस्कृती पाळली. मोहिते पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर महायुतीचा भगवाच फडकवणार आहोत, यात आम्हाला कोणतीही शंका नाही, असे वाघमारे यांनी नमूद केले.
त्या म्हणाल्या, महायुतीचा धर्म पाळा, असा आदेश आम्हाला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. त्याबाबत अत्यंत ठाम आहोत. महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांची आज सकाळीच भेट झाली होती. निवडणूक रणनीतीवर आमच्यात चर्चाही झाली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने वाटत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीम महाविकास आघाडीची अवस्था काय झाली आहे, हे आपण बघितले आहे. अनेक ठिकाणी महाआघाडीला उमेदवार देता आला नाही, ज्या ठिकाणी दिला तेथून त्यांच्या उमेदवारांनी पळ काढला आहे, असा आरोपही वाघमारे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या फेक नॅरेटिव्हवर जिंकून आलेल्यांनी अशा वल्गना करू नये, असा टोलाही त्यांनी दोन्ही खासदारांना लगावला. तसेच, सोलापूरसह राज्यातील सर्व १७ जागांवर महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने जिंकतील, असा दावा त्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.