Solapur : उसाचा गाळप हंगाम सुरू करूनही त्याची माहिती साखर सहसंचालकांना न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर पुढाऱ्यांच्या कारखान्यांचा त्यात समावेश आहे, त्यामुळे या नोटिशीची चर्चा रंगली आहे. (Notice to seven sugar Factory in Solapur district)
ऊसगाळपाची सुरुवात केल्यानंतर त्याबाबतची माहिती साखर सहसंचालकांना देणे कारखाना प्रशासनाला बंधनकारक असते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांनी त्याबाबतची माहिती दिली नसल्याचे या नोटिशीवरून उघड होत आहे. राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊसगाळप हंगाम सुरू झाला आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या सात कारखान्यांमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथील लोकमंगल, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील लोकमंगल, लोकमंगल (माऊली), तसेच पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे, सांगोला तालुक्यातील सांगोला सहकारी साखर कारखाना, अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री लक्ष्मी आणि इंद्रेश्वर याचा समावेश आहे.
लोकमंगल साखर कारखाने हे माजी सहकारमंत्री तथा भाजप नेते सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित आहेत. सहकार शिरोमणी वसंतराव काळे हा कारखाना कल्याणराव काळे, मातोश्री लक्ष्मी हा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा आहे. सांगोला सहकारी साखर कारखाना हा अभिजित पाटील यांनी चालवायला घेतला आहे. बार्शी तालुक्यातील इंद्रेश्वर कारखाना हा माजी सहकारमंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे यामध्ये दोन माजी सहकारमंत्र्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे.
ऊसगाळप हंगामाची सुरुवात झाल्यानंतर ती माहिती देण्यासाठी या कारखान्यांना वारंवार सूचना करण्यात आलेली होती. त्यानंतरही गाळप हंगाम सुरू झाल्याचे या कारखान्यांनी साखर सहसंचालकांना सांगितलेले नाही. त्यानंतर साखर सहसंचालक कार्यालयाकडून नोटीस पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
युक्तिवादाकडे लक्ष
या सात कारखान्यांना वारंवार सूचना करूनही त्यांच्याकडून गाळप हंगामाची माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर या कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याबाबत साखर सहसंचालक पांडुरंग साठे यांच्यापुढे आज (ता. 30 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे. साखर सहसंचालकांना माहिती न देणारे कारखाने सुनावणीत काय युक्तिवाद करतात, हे पाहावे लागणार आहे.
यंदा दर देणे कसे परवडते?
दरवर्षी उसाला 2000 ते 2200 च्या पुढे भाव देणे परवडत नसल्याचे साखर कारखान्याकडून सांगण्यात येते. हीच गोष्ट कारखान्यांना यंदा अडचणीत आणणारी ठरणार आहे. कारण याच साखर कारखान्यांमध्ये यावर्षी ऊसदर देण्याच्या आता स्पर्धा सुरू आहे. उसाच्या टंचाईमुळे यंदा ऊस मिळविण्यासाठी जास्तीत जास्त दर देण्याची स्पर्धा या साखर कारखान्यांमध्ये लागली आहे. मात्र, दरवर्षी 2200 च्या पुढे दर देणे परवडत नसल्याचे सांगणाऱ्या कारखान्यांना या वर्षी 2800 रुपये पहिला हप्ता देणे कसे परवडते, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.