

Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर किणी येथे बेमुदत रास्ता रोको केल्याने पश्चिम महाराष्ट्राचं आर्थिक चक्र थांबले आहे. मुंबईहून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्गच रोखल्याने प्रत्येक क्षेत्राला त्याचा फटका बसला आहे.
उसाला प्रतिटन पहिली उचल ४५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवसही चक्का जामने गाजला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या दिल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दिवसभर आंदोलन सुरू राहूनही राज्य सरकार आणि साखर कारखानदारांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
काल दिवसभर व रात्री उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आजपासून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान मुंबई आणि पुण्याकडे जाणारा भाजीपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोखला आहे.
महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रशासनाने वाहनांचे मार्ग बदलले. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी टेकडी, इचलकरंजी, सांगली, आष्टा, पुलाची शिरोली (सांगली फाटा) आणि शिये फाटामार्गे वाहतूक वळविण्यात आली. पुण्याकडून कोल्हापूरला येणारी वाहने पेठनाका, इस्लामपूर, आष्टा आणि पेठवडगावमार्गे पाठविण्यात आली. मात्र, शिये फाटा, सांगली फाटा आणि तावडे हॉटेल परिसरात दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला.
तातडीने मालपुरवठा करण्यासाठी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत अनेक मालवाहतूक वाहने भरून तयार होती. ही वाहने मुंबईच्या दिशेने रवाना होणार होती. मात्र, आंदोलनामुळे ती जागेवरच थांबवावी लागली. औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी टेकडी ते रेमंड चौक आणि मेट्रो हायटेक पार्कपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या मार्गावरून हजारो कामगारांची ये-जा होत असल्याने पोलिस बंदोबस्तात एक मार्ग सुरू ठेवण्यात आला.
किणी, घुणकी, चावरे, तळसंदे, पारगाव आणि वाठार परिसरातील शेतकऱ्यांनी टोलनाक्यावरील आंदोलनस्थळी भोजनाची व्यवस्था केली. पेठवडगाव परिसरातील महिलांनी राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांसाठी भाकरी आणून दिल्या. शेतकऱ्यांच्या या पाठिंब्यामुळे आंदोलकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
माजी खासदार राजू शेट्टी यांनीही रात्र किणी टोलनाक्यावरच काढली. त्यानंतर आज सकाळपासून आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली असून मुंबईच्या दिशेने जाणारे दूध आणि भाजीपाला रोखण्यास सुरुवात झाली आहे. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका शेट्टी यांनी घेतली आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी रात्रभर महामार्गावर ठिय्या मांडलेल्या शेतकऱ्यांनी सकाळी किणी टोलनाक्याची स्वच्छता केली. आंदोलनस्थळी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच काही शेतकऱ्यांसाठी दूधही आणून देण्यात आले. ऊसदरासाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.