

Baramati Attack News : बारामती विमानतळ परिसरात राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक उद्योगपती राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. स्कूटीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी आपण तुमचे चाहते असल्याचे सांगत त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. याचवेळी फुलांचा गुच्छ देण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिली. या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या खांद्यावर गंभीर जखम झाली असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणा सूर्यवंशी हे वैयक्तिक कामानिमित्त गोजुबावी गावाच्या हद्दीत रेल्वे पुलाजवळ गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत शासनाकडून देण्यात आलेली सुरक्षा नव्हती. दरम्यान, स्कूटीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी चेहऱ्यावर मास्क घातला होता. त्यांनी आपण सूर्यवंशी यांचे चाहते असल्याचे सांगून त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली.
याचवेळी फुलांचा गुच्छ देत असल्याचा बहाणा करून हल्लेखोरांनी सूर्यवंशी यांच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात त्यांच्या खांद्यावर वार झाला असून, जखम सुमारे पाच ते सहा इंच खोल असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले.
हल्ल्याची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास सुरू आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिली. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
या घटनेदरम्यान गोळीबार झाला होता का, याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र, घटनास्थळाच्या तपासणीत गोळीबार झाल्याचे स्पष्ट करणारा कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींशी चर्चा केली असता, त्यांनी मोठा आवाज ऐकू आल्याची माहिती दिली. केवळ मोठा आवाज ऐकू आल्याच्या आधारे गोळीबार झाल्याचे निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
राणा सूर्यवंशी यांची प्रकृती स्थिर
हल्ल्यात जखमी झालेल्या राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यामागील नेमके कारण काय, हल्लेखोर कोण आहेत आणि त्यांनी नियोजनपूर्वक हा हल्ला केला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासातून हल्ल्याबाबत आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.