Solapur News : सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल यांनी पुण्यात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे खरटमल हे मोठ्या पवारांना सोडून अजितदादांसोबत जाणार का? खरटमल यांच्यासोबत इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांनीही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा सोलापूरच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे. (Ravikant Patil and Sudhir Kharatmal meet Ajit Pawar)
सुधीर खरटमल आणि माजी आमदार पाटील यांनी सोलापूर येथील लिंगायत भवन, उजनी धरण-सोलापूर समांतर जलवाहिनी, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक आदीला निधी मिळावा, यासाठी आपण उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना भेटलो आहोत, असे या दोघांनी पवारांच्या भेटीनंतर सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोलापुरातील या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात लवकरच बैठक लावण्यात येईल. त्या बैठकीला तुम्हा दोघांना (रविकांत पाटील आणि सुधीर खरटमल) बोलावण्यात येईल, असे अजित पवार यांनी या दोघांना सांगितले आहे. त्यामुळे सोलापूरच्या प्रश्नावर या दोघांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली असली तरी त्याची राजकीय चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.
सुधीर खरटमल हे काँग्रेसनेते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीचे नियोजन खरटमलच पाहायचे. मात्र, दोन वर्षांपूर्वी खरटमल यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभेबाबत एक विधानही केले होते. त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कलगी-तुरा रंगली होता.
अजित पवार यांनी युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही खरटमल हे शरद पवारांसोबत होते. मात्र, जागावाटपाची चर्चा सुरू झाल्यानंतर खरटमल हे शांत होते. मात्र, आता त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत सामील होतात का, हे पाहावे लागणार आहे.
रविकांत पाटील हे सोलापुरात राहून कर्नाटकातील इंडी मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. कर्नाटकच्या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावून पाहिले होते. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. सध्या पाटील हे राजकीयदृष्ट्या शांत आहेत. मात्र पाटील यांच्या दोन्ही भावांची मुलं राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसची चाचपणी करत आहेत, अशी चर्चा आहे.
Edited By - Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.