Kolhapur Political News : छत्रपती संभाजीराजे यांच्या गटाचा रविवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. संभाजीराजे यांच्या येत्या ११ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या नियोजनाबाबत हा मेळावा झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, या मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीची बीजे पेरली आहेत.
नुकत्याच एका मुलाखतीत संभाजीराजे छत्रपती यांनी महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला पसंत करेन, असे विधान केले आहे. यानंतर आगामी लोकसभेला पूरक वातावरण असणाऱ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला आहे.
माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे यांच्या 11 फेब्रुवारीच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभेची रणनीती ठरवली जात असल्याची चर्चा आहे. नुकतेच संभाजीराजे यांनी मागील जखम आम्ही विसरलेलो नाही, असे सांगत लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. तोच धागा पकडून कार्यकर्तेही उत्साहाने कामाला लागल्याचे दिसत आहेत.
खासबाग मैदान येथे वाढदिवसानिमित्त ‘स्वराज्य केसरी’ या निकाली कुस्त्यांचे भव्य मैदान, तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून संभाजीराजेंचा (Sambhajiraje) मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन असल्याचे बोलले जाते आहे. स्वराज्य संघटनेची स्थापना झाल्यापासून या मेळाव्याने संभाजीराजे गटाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. आता लोकसभेपूर्वी आलेल्या वाढदिवसाच्यानिमित्ताने का होईना संभाजीराजे गट राजकीयदृष्ट्या सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
छत्रपती संभाजीराजे यांच्या अनुपस्थितीमध्येदेखील हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येत भव्य मेळावा पार पाडला. याबाबत संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षण व इतर विषयांच्या निमित्ताने राज्यभर फिरणे झाले. परिणामी कोल्हापूरकडे थोडे दुर्लक्ष झाल्याची खंत आहे. आता मात्र कोल्हापुरात पूर्ण ताकदीने कार्यरत होणार आहे, असे म्हणत त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी कोल्हापूर लोकसभेला सरप्राईज चेहरा असल्याचे सांगत गुगली टाकली आहे, तर दुसरीकडे श्रीमंत शाहूमहाराज यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीराजे आणि आम्ही एकत्र असल्याचे पाटील यांनी सांगितले.
आतापर्यंत झालेल्या इंडिया आघाडीच्या चर्चेत राष्ट्रवादीने कोल्हापूर मतदारसंघावरील दावा सोडल्याचे सांगितले जात आहे, तर आताचा फॉर्म्युला विचारात घेऊन ठाकरे गटाने या जागेवर दावा सांगितला.
काँग्रेसचे नेते सतेज पाटीलही या जागेसाठी आग्रह करीत असल्याचे बोलले जाते. काँग्रेसला ही जागा मिळाली, तर संभाजीराजे यांच्या रूपाने महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.