

Sangli Politics : सांगलीचे काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांना वारंवार भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर दिली जात आहे. विशाल पाटील यांनी मात्र सातत्याने ही ऑफर धुडकावून लावत नकार दर्शवला आहे. तरी पुन्हा एकदा मंत्री विखे पाटील यांनी त्यांना भाजप प्रवेशाची गुगली टाकली आहे. यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दोनवेळा खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. या सगळ्या ऑफर्सच्या मागे भाजपच्या डोक्यात 2029 मधील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार या दृष्टीने बघितले जाते.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपच्या संजयकाका पाटील यांचा पराभव केला. त्याची सल आजही भाजपच्या मनात आहे. पण दुसऱ्या बाजूला निवडणुकीतील पराभवानंतर संजय पाटील यांना बळ देणे आवश्यक होते. ज्याप्रमाणे भाजपच्या पराभूत उमेदवाराला सत्तेच्या माध्यमातून निधीची खैरात दिली जाते, त्याला आर्थिक, राजकीय रसद पुरवून पुढच्या निवडणुकीची तयारी करून घेतली जाते, तसे संजय पाटील यांच्याबाबत झालेले दिसत नाही.
उलट विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीची गरज म्हणून संजय पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवण्यात आलं. आता त्यांना पुन्हा भाजपप्रवेशासाठी पक्षश्रेष्ठी अनुकूल नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सध्या तरी भाजपकडे पुढील लोकसभा निवडणुकीसाठी तगडा चेहरा नाही. त्यातूनच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आत्तापासूनच विशाल पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यांना भाजपमध्ये खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
विशाल पाटील हे तरुण आणि लोकप्रिय चेहरा असल्याने लोकसभा निवडणुकीत हेच नाणे चालेल यांचा अंदाज भाजपला आहे. त्यामुळेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी दोनदा भाजपत प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. त्याला नकार दर्शवल्यानंतर वातावरण काही काळासाठी शांत झाले होते. मात्र विशाल पाटील यांच्यासाठी आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संकेत दिले आहेत. पाटील यांनी जत तालुक्यातील म्हैसाळ विस्तारित बेळंकी (ता. मिरज) येथील कार्यक्रमात विशाल पाटील यांना आमंत्रण देत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाची सल आजही भाजपच्या मनात आहे. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूक, सांगली महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. अशावेळी विशाल पाटील यांच्यासारख्या खासदारांना भाजपमध्ये घेऊन पुढच्या लोकसभेची तयारी भाजप आतापासूनच करत आहे. तशी चर्चाही सांगलीच्या भाजपच्या वर्तुळात आहे. त्यामुळे आगामी काळात विशाल पाटील हे भाजपचे आमंत्रण स्वीकारणार का? हे देखील पहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.