Teachers Suspended : दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीचा दणका! जिल्हा परिषदेच्या ९ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, १३ जणांच्या नोकरीवर टांगती तलवार

Satara Teachers Suspended Over Disability Certificates : दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीसह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या ९ शिक्षकांना दणका शिक्षण विभागाने दिला आहे.
Satara Zilla Parishad teachers suspended News
Satara Zilla Parishad teachers suspended NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara News : बदलीत लाभ मिळविण्यासाठी दिव्यांगत्वाची बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी ९ प्राथमिक शिक्षकांचे निलंबित केले आहे. तसेच १३ शिक्षकांना अपात्र का करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. नागराजन यांनी केलेल्या या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक विभागांतर्गत अडीच हजारांहून अधिक शाळा असून या शाळांमध्ये सुमारे सात हजार शिक्षक कार्यरत आहेत. यातील काही शिक्षकांनी बदलीत लाभ मिळविण्यासाठी स्वतःचे, तसेच कुटुंबातील व्यक्तींचे दिव्यांग आणि आजारपणाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. तर या प्रमाणपत्रांची तपासणी सुरू झाल्यानंतर या शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीसह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ केली होती. ज्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागातील ९ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून संबंधित शिक्षकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी यापूर्वी तीन वेळा नोटीस देण्यात आली होती. वारंवार सूचना करूनही शिक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्यासंबंधीची अन्य कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देऊनही त्यांचे पालन करण्यात आले नसल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. राजेश जाधव, विजया जगदाळे, सुनिता मम्हाणे, दिपाली खानविलकर, शुभांगी रणवरे, संतोष यादव, सुनिता गावडे, कविता शिंदे आणि संजीवन जगदाळे या ९ शिक्षकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.

Satara Zilla Parishad teachers suspended News
primary teachers suspended : तुकाराम मुंडेंच्या निर्णयाचा दणका! प्राथमिक शिक्षकांना भोवली बोगसगिरी, एकाच वेळी १३ जणांचे निलंबन

दुसरीकडे, छाया भोसले, भगवान काटकर, यशवंत कांबळे, निता वाघमारे, उदय भंडारे, मनिषा क्षीरसागर, संतोष कदम, सचिन निकाळजे, पूनम गायकवाड, विजय तुपे, बापूराव सोनवलकर, दिगंबर गायकवाड आणि बाबूसाहेब केदारी या १३ शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची वैद्यकीय पडताळणी करण्यात आली होती.

जिल्हा रुग्णालयातील तपासणीमध्ये त्यांना अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर पुणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयातही प्रमाणपत्रांची फेरपडताळणी झाली. तेथेही संबंधित शिक्षक अपात्र ठरल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. आता जिल्हा परिषद प्रशासनाने या १३ शिक्षकांना सेवेतून काढण्याच्या प्रस्तावित कारवाईबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

५८१ शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेऊन बदली प्रक्रियेत तसेच अन्य शासकीय लाभ मिळवताना गैरप्रकार केल्याच्या तक्रारी मागील वर्षी प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील ५८१ दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची वैद्यकीय फेरतपासणी सुरू केली होती.

या तपासणी प्रक्रियेत काही शिक्षकांच्या प्रमाणपत्रांमध्ये विसंगती आढळून आली असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. सोकासन (ता. माण) येथील जिल्हा परिषद शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक विनायक रामचंद्र पानसांडे यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये अनियमितता आढळल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. तसेच आगाशिवनगर (ता. कऱ्हाड) येथील पदवीधर शिक्षिका सुरेखा प्रभाकर वायदंडे यांच्या प्रमाणपत्रातही तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्या होत्या.

४८ टक्के दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतल्याचा आरोप

सुरेखा वायदंडे यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत प्रशासनाने खुलासा मागवला होता. मात्र, त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने तो स्वीकारण्यात आला नाही. फेरतपासणीमध्ये त्यांचे दिव्यांगत्व १६ टक्के असल्याचे आढळले. जिल्हा रुग्णालयाकडून त्यांना १८ टक्के दिव्यांगत्वाचे यूडीआयडी प्रमाणपत्र देण्यात आल्याची नोंद आहे.

Satara Zilla Parishad teachers suspended News
primary teachers suspended : तुकाराम मुंढेंच्या निर्णयानं शिक्षण खातं हादरलं; एका दणक्यात तीन शिक्षक तडकाफडकी निलंबित

मात्र, बदली प्रक्रियेत लाभ मिळवण्यासाठी त्यांनी कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या ४८ टक्के दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राचा वापर केल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. या प्रकरणात प्रशासनाची दिशाभूल झाल्याचे नमूद करत सुरेखा वायदंडे यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कऱ्हाड तालुका गटशिक्षणाधिकारी यांना आदेश देण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.