

Solapur, 06 October : माढा तालुक्यातून राजकीय कारकिर्दीस सुरुवात करून सोलापूर जिल्हा, मराठवाडा आणि पुढे राज्याच्या मंत्रिमंडळापर्यंत पोचलेले सावंत कुटुंबीयांमध्ये मध्यंतरी फूट पडली होती. विशेषतः माजी मंत्री तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांच्यात वाद झाला होता. मात्र, त्या वादावर आता पडदा पडला असून सावंत कुटुंबीयांत अखेर मनोमिलन झाले आहे.
दरम्यान,सावंत कुटुंबीयांच्या मनोमिलनाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यात माजी मंत्री तानाजीराव सावंत, शिवाजी सावंत आणि त्यांची मुलं दिसून येत आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन प्रा. शिवाजी सावंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय वाटचालीचा श्रीगणेशा केला होता. कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रा. सावंत यांनी शिवसेनेत नेटाने कामाला सुरुवात केली होती. त्या बळावरच त्यांनी जिल्हा परिषद सदस्य, विरोधी पक्षनेता म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेत काम केले होते. त्यामुळे सावंत कुटुंबीयांची ओळख जिल्ह्यात झाली.
प्रा. तानाजी सावंत यांनी जीएसपीएमच्या माध्यमातून आपला विस्तार वाढवला होता. त्यांनीही शिवसेनेच्या माध्यमातून विधान परिषदेची आमदारकी मिळविली. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदारसंघात राजकीय बस्तान बसविले.
शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तानाजी सावंत यांना महायुती सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून थेट कॅबिनेटमध्ये संधी मिळाली. त्यामुळे सावंत कुटुंबीयांचा सोलापूर, धाराशिव आणि राज्याच्या राजकारणात चांगला दबदबा वाढला.
दुसरीकडे, भैरवनाथ शुगर आणि जेएसपीएम या माध्यमातून साखर कारखानदारी आणि शिक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण झाला. पाच बंधू आणि त्यांची ११ मुले या सर्व संस्थांचा कारभार पाहू लागली होती. राज्याच्या राजकारणातील एकत्र कुटुंबातील मोठे घराणे म्हणून सावंत कुटुंबीयांचे नाव चर्चेत येऊ लागले.
उद्योग, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात नावलौकिक होत असताना शिवाजी सावंत आणि तानाजी सावंत यांच्यात मतभेद निर्माण झाले. या मतभेदाची नेमकी कारणे पुढे आली नसली तरी भैरवनाथ शुगरचे विभाजन करून माढा तालुक्यातील राजवी आणि करमाळा तालुक्यातील शिवगिरी हे दोन कारखाने स्वतंत्र झाले, हे मानले जाते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या दोन भावांमध्ये जाहीरपणे वाद झाला.
शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम दोन वेळी ठरूनही तो ऐनवेळी रद्द झाला. त्यामागे तानाजी सावंत असल्याचा आरोप शिवाजी सावंत यांनी केला होता. त्यावेळी दोन्ही भावांमध्ये टोकाचे मतभेद झाल्याचे पुढे आले होते.
शिवाजी सावंत यांचे चिरंजीव पृथ्वीराज सावंत यांनी भाजपमधून जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली. मात्र, चुलते शिवसेनेत तर पुतण्या भाजपमध्ये अशी राजकीय विभागणी झाली होती. मात्र, मंगळवारी (ता. ६ ऑक्टोबर) प्रा. शिवाजी सावंत आणि प्रा. तानाजी सावंत तसेच प्रा. शिवाजी सावंत यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, वाकवचे माजी सरपंच ऋतुराज सावंत यांची माजी मंत्री तानाजी सावंतांसोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. त्यामुळे सावंत कुटुंबातील मतभेद भेटून हे घराणे एकत्र आले आहे.
राजकारणात व कुटुंबात महत्वपूर्ण भूमिका घेणाऱ्या प्रा. शिवाजी सावंत व प्रा. तानाजी सावंत या दोन्ही बंधूंचे मनोमिलन झाले आहे, ही गोष्ट कुटुंबीयांचा तसेच त्यांच्या समर्थकांचा उत्साह वाढवणारी आहे. शिवसेना नेते डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपण पुन्हा जोमाने काम करणार असल्याचे शिवाजी सावंत यांनी जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.