

Kolhapur News : "पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार सुशिक्षित आणि प्रगल्भ असून तो विचारपूर्वक मतदान करेल याची मला खात्री आहे. सध्या संविधानाने दिलेला मताचा अधिकारच धोक्यात आला असून ही परिस्थिती संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनी एक होण्याची गरज आहे. आमची लढाई कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून चुकीच्या व्यवस्थेविरुद्ध आहे. देशातील वाढती महागाई आणि भ्रष्टाचार पाहता महायुती सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे, असा थेट घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. खासदार सुळे पुढे म्हणाल्या, 'आपला उमेदवार हा तुमची विचारधारा मानणारा आणि प्रश्नांची जाण असणारा असावा. जंतरमंतरवर लढणारी नवी पिढी जात-पात व लिंगभेद न मानता केवळ जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत आहे. तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्याची ताकद असणाऱ्या हर्षदा देशमुख-जाधव व जयंत आसगावकर यांना निवडून द्यावे.'
यावेळी आमदार सतेज पाटील (Satej patil) म्हणाले, 'ही निवडणूक केवळ दोन आमदारांना निवडून देण्याची नसून पुरोगामी विचार आणि कर्मवीर अण्णांना अभिप्रेत असलेली शिक्षण व्यवस्था टिकवण्याची आहे. ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्यांचा इतिहास बदलण्याचा व चुकीचा इतिहास सोशल मीडियावरून पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आपण वैचारिकदृष्ट्या सजग राहून मतदान केले नाही, तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही."
उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव म्हणाल्या, 'शिक्षकांना अशैक्षणिक कामांत व्यस्त ठेवल्यामुळे शिक्षणाची हेळसांड होत आहे. डिजिटल इंडियाच्या बाता मारल्या जात असल्या तरी शाळा डिजिटल पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. पटसंख्येच्या अटीमुळे शिक्षक संख्या घटत असून पेपरफुटीमुळे सामान्य पदवीधरांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. या सर्व अन्यायाविरुद्ध महाविकास आघाडी रस्त्यावरची लढाई लढत आहे. या लढाईला बळ देण्यासाठी मला आपले बहुमोल मत देऊन विजयी करा.'
या बैठकीस सरोज ऊर्फ माई पाटील, व्ही. बी. पाटील, एम. बी. शेख, भरत रसाळे, संगीता पाटील, प्रभाकर देशमुख यांच्यासह पदवीधर व शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांनी घेतला प्रचार यंत्रणेचा आढावा
मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रचार यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. "कार्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सजग राहून मतदारांपर्यंत पोहोचावे. मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्यास सज्ज आहेत, फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून मतदानाचे आवाहन करायचे आहे," असे मार्गदर्शन त्यांनी केले.
हर्षदा देशमुख-जाधव यांचा कोल्हापुरात प्रचाराचा धडाका
पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी कोल्हापुरात प्रचाराचा धडाका उडवून दिला. दिवसभरात त्यांनी भारती विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ आणि काँग्रेस कमिटी येथे भेटी देऊन मतदार व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला तसेच संपूर्ण प्रचार यंत्रणेची पाहणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.