

Krishna Sugar Factory Election: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष वेधणाऱ्या रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांची कारखान्यावर घट्ट पकड आहे. मात्र, सध्या नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या धामधुमीतून भोसले गटाच्या विरोधात असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील नेत्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत साखरपेरणी सुरू केली. भोसलेंविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सध्या चर्चा सुरू आहेत.
सातारा, सांगली जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याची निवडणूक दरवेळी राज्यात गाजते. कृष्णाकाठचे राजकारणच प्रत्येक निवडणुकीत बदलत असल्याने त्याची राज्यभर चर्चा होते. २०२१ मध्ये सातारा, सांगली जिल्ह्यांत कृष्णा कारखान्याची ४७ हजार १४५ सभासद संख्या होती. कृष्णा कारखान्याच्या २९ जून २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉ. भोसले, भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे जयवंतराव भोसले यांचे सहकार पॅनेल, कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल निवडणुकीस सामोरे गेले होते.
गेल्या निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणून निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी बोलावलेल्या बैठकीत बोलणी फिसकटल्याने कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनेल अशी दोन पॅनेल स्वतंत्र लढली. ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी त्यावेळी संस्थापक पॅनेलला, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी रयत पॅनेलला साथ दिली.
त्यावेळी जोमात असलेल्या काँग्रेसचीच मतविभागणी झाली. त्याचा परिणाम होऊन सत्ताधारी डॉ. भोसले यांच्या जयवंतराव भोसले पॅनेलने निर्विवाद वर्चस्व राखत सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या. विरोधी आघाडीच्या पॅनेलला भोपळाही फोडता आला नाही. तेथे भाजपचे आमदार डॉ. भोसले यांच्याकडून हा कारखाना ताब्यात घेण्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांचे प्रयत्न अपयशी ठरले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उडालेल्या प्रचाराच्या धुरळ्यात भोसले गटाच्या विरोधात असलेल्या विविध पक्षाच्या नेत्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने साखर पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल. त्यानंतर मिशन कृष्णा कारखाना घेऊन कारखान्यातील सत्ताधारी भोसले गटाच्या विरोधकांकडून मोर्चेबांधणी सुरू केली जाणार आहे.
दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भोसले, आमदार डॉ. भोसले यांनीही कारखाना ताब्यात राहण्यासाठी फील्डिंग लावली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, शेतीमित्र अशोकराव थोरात या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. त्याला कितपत यश येईल, हे लवकरच समजेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील हे वाळवा-ईश्वरपूरचे आमदार आहेत. कृष्णा कारखान्याचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील सर्वच सभासद मतदार हे इस्लामपूर मतदारसंघात येतात. रेठरे हरणाक्ष-बोरगाव आणि नेर्ले- तांबवे या गटातून बहुतांश संचालक म्हणूनही अनेकजण निवडून येतात. शिराळा मतदारसंघातील काही गावांत कृष्णेचे सभासद आहेत. इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातील ३९ गावांत कृष्णेचे सुमारे १४ हजारच्या दरम्यान सभासद आहेत. यामुळे जयंत पाटील यांच्या भूमिकेला कृष्णेच्या निवडणुकीत महत्त्व असते.
विश्वजित कदम यांचे यशवंतराव मोहिते यांच्या घराण्याशी जवळचे संबंध आहेत. कदम-मोहिते घराण्याचे आधीपासूनच एकमेकांना मदत होत असल्याने आमदार कदम यांची डॉ. इंद्रजित मोहिते यांना मदत होते. विश्वजित कदम यांच्या पलूस-कडेगाव मतदारसंघातील २१ गावांमध्ये कृष्णेचे सुमारे तीन हजार सभासद आहेत, तसेच त्यांच्या भारती विद्यापीठ व इतर संस्थांचे जाळे कृष्णेच्या कार्यक्षेत्रात असल्याने त्यांचीही भूमिका कृष्णेच्या राजकारणात महत्त्वाची ठरते. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या कऱ्हाड उत्तरचे मतदारसंघातील १० गावांत कृष्णेचे जवळपास १५०० सभासद आहेत. त्यांचीही भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.