Sawant Politic's : सावंतांच्या पुतण्याने एका काकाला दाखवला 'कात्रजचा घाट'; तर दुसऱ्यासाठी केली राजकीय बेरीज

Bhalke-Sawant Enrty Shivsena Issue : भालके-सावंत यांच्या शिवसेना प्रवेश निर्णयानंतर पंढरपूरमध्ये सावंत कुटुंबातील संघर्ष आणि आघाडीवरील दावे यामुळे राजकारण अधिक तापले आहे.
Tanaji Sawant
Tanaji Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 April : पंढरपूरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. भाजपकडून होणाऱ्या आर्थिक नाकेबंदीतून सुटका करून घेण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके आणि भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. त्यावरून सावंत कुटुंबात शह-कटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.

तीर्थक्षेत्र आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आघाडीवर दावा केला. त्यांच्यासोबत शिवाजी सावंत (Shivaji Sawant) होते. त्यानंतर अनिल सावंतांनी काकाला कात्रजचा घाट दाखवत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांना सावंतांच्या पुण्यातील हवेलीत हजर केले. त्यामुळे पंढरपूरचे राजकारणाला दररोज कलाटणी मिळत आहे.

भगीरथ भालके, मनसेचे दिलीप धोत्रे, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, अनिल सावंत (Anil Sawant) यांनी एकत्र येत पंढरपूरमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गडाला सुरुंग लावला. नगराध्यक्षपदी भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके या तब्बल ११ हजार मताधिक्य घेऊन निवडून आल्या. मात्र, नगरपरिषदेचा कारभार करताना सत्ताधारी पक्षात नसल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होऊ लागली, त्यामुळे भालके आणि सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

भालके आणि सावंत यांच्या निर्णयाला विरोध करत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आठ ते दहा नगरसेवकांनी भालके यांच्याशी आमचा संबंध नाही. आघाडी ही आमची आहे, त्यामुळे व्हीपचा निर्णय इतर कोणाला नाही, असा दावा करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना त्यांच्यासोबत भाजप नेते तथा तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतही होते, त्यामुळे पंढरपूरच्या राजकीय घडामोडीच्या माध्यमातून शिवाजी आणि तानाजी सावंत यांच्यात शह कटशहाचे राजकारण सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Tanaji Sawant
Solapur Collector Transfer : प्रणिती शिंदेंचा खळबळजनक आरोप; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दबावामुळे स्वतःहून बदली करून घेतली...

शिवाजी सावंत यांनी टाकलेल्या डावाला माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पुतणे अनिल सावंत यांच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी पंढरपुरातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, नगरसेवक संजय बंदपट्टे, प्रसाद कळसे, अक्षय गंगेकर, किरण घाडगे, सुधीर धोत्रे, धनंजय धोत्रे यांना घेऊन काका तानाजी सावंत यांचे पुण्यातील घर गाठले. मात्र या भेटीवेळी नागेश भोसले हे आजारी असल्यामुळे अनुपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. भालके यांनी वगळून या नगसेवकांनी सावंतांची भेट घेतल्याने पंढरपूरच्या राजकारणाला वेगळी कलाटणी लागली आहे.

आता शिवाजी सावंत यांचे काय उत्तर असणार, याची पंढरपूर-मंगळेवढ्याला उत्सुकता आहे. दोन्ही सावंत बंधूंमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याचे सातत्याने समोर आले आहे. त्यातच अनिल सावंत आणि शिवाजी सावंत यांच्यातही मतभेद आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी शिवाजी सावंतांनी कोण अनिल सावंत असा सवाल केला होता, त्यामुळे सावंत कुटुंबातील शह-कटशहाचे राजकारण कुठपर्यंत जाते हे पाहावे लागणार आहे.

Tanaji Sawant
Solapur BJP : माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग; भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, तिघे प्रबळ दावेदार

येत्या रविवारी (ता. १२ एप्रिल) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे, त्यावेळी त्यांच्यासोबत कोण कोण शिवसेनेत प्रवेश करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com