MLC Election : ना तिकीट वाटपाचा गोंधळ, ना बंडखोरीची हिंमत! वसंतदादांनी सांगली-सातारच्या जागेवरून थेट 'नांदेडच्या' नेत्याला आमदार बनवलं

MLC Election : वसंतदादा पाटील यांनी १९७८ मध्ये सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघातून स्थानिक नेत्यांऐवजी नांदेडच्या सय्यद फारुख पाशा यांना उमेदवारी देत महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळा इतिहास घडवला.
Former Maharashtra CM Vasantdada Patil
Former Maharashtra CM Vasantdada PatilSarkarnama
Published on
Updated on

MLC Election : आजच्या राजकारणात सत्तेसाठी निष्ठा बदलल्या जातात, एखाद्याचं राजकारण संपवण्यासाठी, तिकीट कापण्यासाठी डावपेच आखले जातात. अशा काळात भूतकाळातल्या एका अशा घटनेकडे पाहायला हवं, ज्याचा विचार केला तरी राजकारणातील दिलदारपणा काय असतो याची जाणीव होते. राजकारणात 'आपल्या' माणसाच्या पाठीशी कसं उभं राहायचं, याचा एक आदर्श वस्तुपाठ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांनी घालून दिला होता.

हा किस्सा आहे एका अशा निष्ठेचा, ज्यासाठी दादांनी थेट भौगोलिक सीमा ओलांडून 'नांदेडच्या' एका नेत्याला 'सांगलीचा' आमदार बनवलं होतं. वसंतदादा पाटील हे केवळ नेते नव्हते, तर ते कार्यकर्त्यांचे 'माऊली' होते. त्यांच्या राजकारणाचा पायाच मुळी 'माणूस' हा होता. जो संकटात सोबत राहिला, त्याला सत्तेच्या शिखरावर कसं न्यायचं, हे दादांना चांगलं ठाऊक होतं.

१९७८ चे ते वर्ष होते. महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ सुरू होती. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. अशावेळी यशवंतराव चव्हाण नेतृत्व करत असलेला 'रेड्डी काँग्रेस' आणि इंदिरा काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. रेड्डी काँग्रेसचे जास्त आमदार असल्याने वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर इंदिरा काँग्रेसच्या नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

या सरकारमध्ये शरद पवार यांनी उद्योगमंत्री म्हणून कारभार हाती घेतला. पण हे सरकार फार काळ टिकू शकलं नाही. दोन्ही काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला गेला. जुलै १९७८ मध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, शरद पवार ४० आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी 'पुरोगामी लोकशाही दल' (पुलोद) स्थापन केलं आणि जनता पक्षाच्या पाठिंब्याने शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. या राजकीय भूकंपामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. अनेक जण सत्ताधारी गटाकडे आकर्षित होत होते.

Former Maharashtra CM Vasantdada Patil
MLC Election news : विधानपरिषदेचे आघाडीचे जागावाटप जाहीर; पुणे, ठाणे पवारांकडे, ठाकरेंच्या वाट्याला 4 जागा, वाटाघाटीत काँग्रेसच मोठा भाऊ...

पण याच वादळातही काही नेते असे होते, ज्यांनी सत्तेची हाव न धरता वसंतदादांसोबत गद्दारी केली नाही. या निष्ठावंतांच्या यादीतलं एक अग्रगण्य नाव होतं — सय्यद फारुख पाशा! नांदेडचे सय्यद फारुख पाशा हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत नेते आणि वसंतदादांचे अत्यंत निकटवर्तीय. १९६२ ते १९७८ पर्यंत सलग ३ वेळा ते नांदेड दक्षिण मतदारसंघातून निवडून आले होते. वसंतदादांनी त्यांच्या कर्तृत्वाची कदर करत त्यांना विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणूनही संधी दिली होती.

दादा आणि पाशा यांची मैत्री घट्ट होती, त्यांची कायम उठबस असायची. पण १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत सय्यद पाशा यांचा पराभव झाला. त्या काळात एकदा पराभव झाला की राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याची भीती असायची. पाशा यांच्यासारखा एक सच्चा, निष्ठावंत आणि सुशिक्षित सहकारी सभागृहाच्या बाहेर आहे, याची सल वसंतदादांच्या मनाला सतत बोचत होती. "पाशा यांच्यासारखा हिरा सभागृहात असायलाच हवा," हा ध्यास दादांनी घेतला होता.

१९७८ च्या उत्तरार्धात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लागली. सांगली-सातारा परिसरात चर्चांना उधाण आलं. कृष्णा-वारणा खोऱ्यातील सहकार क्षेत्रातील बड्या नेत्यांची या मतदारसंघावर मजबूत पकड होती. जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका सदस्य आणि जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य हेच याचे मतदार असायचे. त्या काळात ही निवडणूक बहुतांश वेळा बिनविरोध व्हायची. म्हणजेच, ज्याला उमेदवारी मिळाली, तो आमदार झालाच म्हणून समजा! सांगलीतील अनेक मातब्बर नेते या तिकिटासाठी देव पाण्यात घालून बसले होते.

पण, वसंतदादांनी एक धक्कादायक निर्णय घेतला. या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. दादांनी सांगलीच्या किंवा साताऱ्याच्या कोणत्याही स्थानिक नेत्याला संधी न देता, थेट नांदेडच्या सय्यद फारुख पाशा यांचं नाव जाहीर केलं! सांगलीच्या मातीशी संबंध नसलेला, इथल्या सहकारात सक्रिय नसलेला, इथल्या कार्यकर्त्यांना अनोळखी असलेला एक माणूस सांगलीतून विधानपरिषदेवर जाणार होता. आजच्या काळात असं घडलं असतं तर बंडखोरी झाली असती, पुतळे जळले असते. पण तो काळ वेगळा होता आणि तो नेता 'वसंतदादा' नावाचा होता!

Former Maharashtra CM Vasantdada Patil
MLC election : विधानपरिषद निवडणुकीत भाजपला 2 मतदारसंघात धोक्याची घंटा : अर्ज भरण्यापूर्वीच उमेदवार डेंजर झोनमध्ये

"माणूस दादांचा आहे ना? मग आमचाच आहे!"

सांगलीची जनता आणि इथले काँग्रेस कार्यकर्ते सय्यद पाशा यांना ओळखत नव्हते. पण कार्यकर्त्यांनी एकच विचार केला "उमेदवार कोणीही असो, त्याला संधी माझ्या दादांनी दिली आहे ना? मग तो आमचाच माणूस!" वसंतदादांवरील प्रेमापोटी सांगलीच्या सहकार सम्राटांनी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आपापले हेवेदावे बाजूला ठेवले. दादांचा शब्द हाच कार्यकर्त्यांसाठी अंतिम आदेश होता. नांदेडचे सय्यद फारुख पाशा सांगली-सातारा स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून विधानपरिषदेवर पोहोचले.

जेव्हा पाशा आमदार झाले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी दादांचे आभार मानले, तेव्हा दादा फक्त एवढंच म्हणाले, "पाशा साहेब, तुम्ही संकटात पक्षाची साथ सोडली नाही, ही तर तुमच्या निष्ठेची पावती आहे."

५० वर्षांनंतरही आठवणी जिवंत...

आज या घटनेला जवळपास ५० वर्षे पूर्ण होत आली आहेत. कृष्णा खोऱ्यातून खूप पाणी वाहून गेलं आहे. आज विधानपरिषद सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तिकीट वाटप आणि गणितांची चर्चा सुरू झाली आहे. अशावेळी जुन्या पिढीतले कार्यकर्ते स्व. वसंतदादा पाटील यांच्या या 'थोर मनाची' आणि सय्यद पाशा यांच्या 'निष्ठेची' आठवण काढल्याशिवाय राहत नाहीत.

वसंतदादांनी दाखवून दिलं होतं की, राजकारण हे फक्त हिशोबांचं नसतं, तर ते काळजाचं असतं. आपल्या माणसाला संकटाच्या काळात आधार देणे आणि त्याच्या निष्ठेचा आदर करणे, हाच खऱ्या नेतृत्वाचा धर्म आहे. ही आठवण आजही सांगलीच्या मातीला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एका समृद्ध संस्कृतीची जाणीव करून देत राहते!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com