MLC Election : भाजपला धास्ती कोणाची? : सांगलीत ‘जयंत’नीतीची, तर साताऱ्यात ‘दुखावलेल्या मित्रां’ची; सदस्यांना पाठविले अज्ञातस्थळी

BJP Political News : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीतील मतभेद, राष्ट्रवादीच्या बैठका आणि भाजपची रणनीती यामुळे राजकीय लढत निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे.
BJP Member
BJP MemberSarkarnama
Published on
Updated on

Satara, 15 June : सांगली-सातारा विधान परिषदेचे मतदान जसजसे जवळ येऊ लागले आहे, तसतसे वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुतीची कराडमध्ये समन्वय बैठक झाली, त्या बैठकीला शिवसेना-राष्ट्रवादीने दांडी मारली. त्यानंतर दोनच दिवसांत म्हणजे रविवारी राष्ट्रवादीची सातारमध्ये बैठक झाली. सांगलीत ‘जयंतनीती’ची, तर साताऱ्यात ‘दुखावलेल्या मित्रां’च्या धास्तीमुळे धोका नको; म्हणून भाजपने आपले सदस्य अज्ञातस्थळी पाठविले आहेत. त्यामुळे सांगली साताऱ्यातील लढाई निर्णायक वळणावर आल्याचे मानले जात आहे.

विधान परिषदेच्या १७ जागांपैकी सर्वाधिक चुरशीची लढत ही सांगली-सातारामध्ये होताना दिसत आहे. भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उद्योजक अभयसिंह जगताप निवडणूक लढवत आहेत.

सांगली-सातारा मतदारसंघात एकूण ८९५ मतदार संख्या असून सातारा जिल्ह्यात ४७२, तर सांगलीत ४२३ मतदार आहेत. यात भाजप ३४५, राष्ट्रवादी २११, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ११९, शिवसेना १११, काँग्रेस ७५, अपक्ष ३१ मतदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, रयत क्रांती व जनसुराज्य यांच्याकडे प्रत्येकी एक मतदार आहेत.

विधान परिषदेचे मतदान हे गुप्त पद्धतीने होते. तसेच या निवडणुकीत पक्षादेश (व्हिप) लागू होत नाही, त्यामुळे घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. मतदार कोणाला मत देईल, हे शेवटपर्यंत सांगता येत नाही, त्यामुळे सांगली-साताऱ्यात ‘लक्ष्मीदर्शन’ मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपने आपल्या हक्काच्या मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून काळजी घेतल्याचे दिसून येते.

BJP Member
MLC Election : मकरंदआबांच्या भूमिकेने भाजपची धाकधूक वाढवली; ZPतील वागणुकीबाबत सदस्यांच्या भावना तीव्र

सांगली जिल्हा परिषदेत माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील या त्रिकूटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीमुळे भाजपची डाळ शिजू दिली नव्हती. आताही सांगलीत भाजपकडून माजी खासदार संजयकाका पाटील यांना पक्षप्रवेश देऊन त्यांची मते खेचण्याची चाल खेळत आहे. तसेच, जयंत पाटील आणि काँग्रेसच्या दोन तरुण नेत्यांचे डावपेच भाजपला उधळून लावावे लागणार आहेत. सांगलीत भाजपला ‘जयंत-विशाल-विश्वजीत’नीतीची भीती वाटत असल्यानेच त्यांनी आपले मतदार सुरक्षितस्थळी हलवल्याची चर्चा आहे.

सांगलीत ज्याप्रमाणे भाजपला जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांचा राजकीय डावपेचाची धास्ती आहे, त्याचपद्धतीने साताऱ्यात दुखावलेल्या मित्रांची आहे. झेडपी निवडणुकीत भाजपने हक्काच्या दोन मित्रांना कमालीचे दुखावले आहे. त्यांचे सदस्य फोडून सत्ता हस्तगत केली आहे. त्यावेळी घडलेल्या घडामोडी सदस्य अजूनही विसरले नसल्याचे दिसून येत आहे.

आम्हाला बोलावलंच जात नाही

भाजपकडूनही या दोन्ही पक्षाचे मंत्री शंभूराज दसाई आणि मंत्री मकरंदआबा पाटील यांनाही बैठकांना बोलावले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द शंभूराज देसाई यांनीच ही गोष्ट पुढे आणली आहे. आपल्या भाजपकडून बैठकांना बोलावले जात नाही, तर आम्ही कसे जायचे, असा सवाल देसाई यांनी विचारला होता, त्यामुळे महायुतीमध्ये साताऱ्यात किती समन्वय आहे, हे दिसून येते.

दुखावलेले मित्र हिसका दाखवण्याच्या ‘मूड’मध्ये

सांगलीत जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम हे नेते अभयसिंह जगतापांच्या पाठीशी आहेत. तसेच जगताप हे साताऱ्यातील असून माण खटावे नेते आहेत, त्याच भागातील नेत्यांना झेडपी निवडणुकीत उचलण्यात आले होते, त्यामुळे दुखावलेले मित्र भाजपला हिसका दाखवण्याच्या ‘मूड’मध्ये असू शकतात.

BJP Member
MLC Election: विधानपरिषद निवडणुकीत प्रचारबंदी आहे का? नगरसेवकांच्या जबरदस्तीच्या सहलींवर निवडणूक आयोग मूग गिळून गप्प

फोडाफोडीचा करेक्ट कार्यक्रम

साताऱ्यात आक्रमक रणनीतीसाठी भाजपकडे तगडी टीम आहे. दोन मंत्री आणि आमदारही सोबत आहेत. जयकुमार गोरे यांच्या रणनीतीकडे दोन्ही जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. ते झेडपीप्रमाणे विधान परिषदेतही फोडाफेाडीचा करेक्ट कार्यक्रम करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com