
Solapur, 20 April : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांनी माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलचा दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माजी आमदार शिंदेंच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती. त्यावरून आमदार पाटील यांनी रोहित पवारांवर टीका करताना त्यांनी शिंदेंचा उघडपणे प्रचार केला, असा टोला लगावला.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Adinath Sugar Factory) हा आमदार रोहित पवार यांनी राज्य सहकारी बॅंकेकडून चालविण्यासाठी घेतला होता. त्यावेळी आदिनाथ कारखान्यावर बागल गटाची सत्ता होती. पण, नारायण पाटील यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ला चालविण्यासाठी देण्यास विरोध दर्शविला होता. पुढे, कारखान्यावर प्रशासक आला आणि पुढे काखान्याची निवडणूक जाहीर झाली.
आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत बारामती ॲग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी माजी आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला होता. गुळवे हे शिंदे यांच्या प्रचारात सक्रीय सहभागी झाले होते. त्यावरून आमदार नारायण पाटील यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार नारायण पाटील (Narayan Patil) म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलचा उघडपणे प्रचार केला. माझ्या पक्षाचे आमदार असूनही त्यांनी मला मदत केली नाही. कारण आदिनाथ कारखाना ‘बारामती ॲग्रो’ला चालवण्यास देण्यासाठी मी विरोध केला होता, त्यामुळे रोहित पवार यांची माझ्यावर नाराजी होती.
रोहित पवार यांचा करमाळा तालुक्यातील कार्यकर्ता सुभाष गुळवे यांनी संजय शिंदे यांचा पळून पळून प्रचार केला. आगामी काळात रोहित पवारांची मदत घ्यायची की नाही, ही पुढची दिशा पुढे ठरेल. आदिनाथ कारखाना निवडणुकीसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोणताही सल्ला दिला नव्हता. आदिनाथ कारखाना निवडणुकीतील रोहित पवारांची भूमिका आम्हाला चुकीची वाटते. त्यांना काय वाटतंय, हे मी सांगू शकत नाही, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आमचा विजय झाला आहे, त्यामुळे मी रोहित पवार यांची पक्षाकडे तक्रार करणार नाही. आम्ही अशा गोष्टीकडे अजिबात लक्ष देणार नाही, असेही नारायण पाटील यांनी नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.