

Pune News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख असलेल्या सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर ते पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले होते. त्यामुळे पुण्यातील त्यांचे जुने सहकारी देखील त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षांमध्ये दाखल होणार का? या चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यासोबतच सुषमा अंधारेंच्या शिवसेना पक्षप्रवेशाबाबत सचिन अहिरांनी मोठे विधान केले.
पुण्यात माध्यमांशी बोलताना विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर म्हणाले, 'मी पुण्याचा संपर्कप्रमुख होतो. त्यामुळे भविष्यात जेव्हा संघटनात्मक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्याची गरज असेल तेव्हा मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. त्याची सुरुवात झाली असून काही दिवसांपूर्वी बारामतीचे तालुका प्रमुख राजेंद्र काळे, इंदापूरच्या तालुकाप्रमुखासह इतरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. मी पक्ष फोडून ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला नसून आहे ती ताकद कशी अधिक करता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे.
सध्य परिस्थितीला पुणे शहरांमध्ये पक्षाची ताकद वाढवणे गरजेचे असून आता आमच्या पक्षाचा एकही नगरसेवक नाही. त्यामुळे महापालिकेमध्ये आमचा परफॉर्मन्स वाढणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका लढलेल्या उमेदवारांची एक बैठक घेऊन त्यांची समस्या ऐकून पक्ष वाढीसाठी काय करता येईल ? याबाबत चर्चा करणार आहे.
पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये मला मानणारे अनेक लोक आहेत. ते यापूर्वी माझ्यासोबत पक्ष प्रवेश करायला तयार होते आणि आताही ते येऊ शकतात. मात्र, मी कोणालाही फोडून इकडे घेऊन येणार नाही. तर मी घेतलेला निर्णय ज्यांना योग्य वाटतोय अथवा विकास कामासाठी ज्यांना यायचे आहे. त्यांना येत्या काळात सोबत घेऊन काम करणार असल्याचे आहेर म्हणाले.
सचिन अहिर यांच्यासोबत सुषमा अंधारे यांच्या देखील पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. याबाबत विचारले असता अहिर म्हणाले, माझ्यासोबत सुषमा अंधारे प्रवेश करणार असे काही ठरले नव्हते. सुषमा अंधारे यांच्याबाबत माझी वैयक्तिक भूमिका होती. त्या काम करणाऱ्या सहयोगी होत्या. त्यामुळे जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून पक्ष संधी देण्याचा विचार करतो, तेव्हा त्यांचा विचार व्हावा अशी माझी भूमिका होती. त्यांनी सबंध महाराष्ट्रात चारशे ते पाचशे सभा घेतल्या होत्या. पुणे, मराठवाडा, बीड या ठिकाणी त्यांनी पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडली होती. त्यामुळे त्यांना संधी मिळावी, अशी भूमिका मी त्यावेळी मांडली होती.
सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशाबाबत कोणतीही चर्चा त्यांच्या सोबत झाली नव्हती. त्यांची देखील मानसिकता तशा पद्धतीची नाही. त्या सध्या आहेत त्याच पक्षात राहणार आहेत. त्यामुळे किमान आता तरी पक्षाने त्यांना योग्य न्याय द्यावा, अशी माझी अपेक्षा आहे असे अहिर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.