
दिल्ली : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभादरम्यान आपण माझ्याविषयी दाखवलेली आपुलकी भावणारी होती, अशा शब्दात ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविलेल्या आपुलकीचे कौतुक केले. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानणारे पत्र शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होते, तर शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. पवार यांच्याच निमंत्रणावरून मोदी यांनी उद्घाटनाला येण्याचे मान्य केले होते.
या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या पत्रात पवार म्हणाले, सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आयोजित केलेले साहित्य संमेलन ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरले. आपल्या सखोल आणि चिकित्सक भाषणाने जगभरातील मराठी लोकांच्या मनाला स्पर्श केला. उद्घाटन समारंभादरम्यान आपण माझ्याविषयी दाखवलेली आपुलकी भावणारी होती.
या पत्रात पवार यांनी दिल्लीत मराठा योद्ध्यांचे पुतळे उभारावेत अशी मागणीही केली आहे. तालकटोरा स्डेडियमच्या जागेवर पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर या योद्ध्यांनी छावणी उभारली होती. त्यांच्या पराक्रमाने आणि योगदानाने भारतीय इतिहासात अजरामर स्थान मिळवले आहे. हीच आठवण जपण्यासाठी 'सरहद तर्फे या वीरांचे अर्धपुतळे उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
मात्र, अनेकांचे असे मत आहे की, या महान योद्ध्यांना अधिक योग्य सन्मान मिळावा म्हणून तिथे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारले जावेत.
तालकटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली महापालिकेच्या अखत्यारात येत असल्याने, इथे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारण्याची आवश्यक परवानगी देण्यासाठी आपण दिल्ली सरकार आणि महापालिकेला सूचना द्याव्यात, अशी विनंती पवार यांनी केली. भारतातील गौरवशाली इतिहासाचे संवर्धन आणि सन्मान करण्याच्या दृष्टीने आपले नेतृत्व नेहमीच महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेऊन आवश्यक तो निर्णय होईल, अशी अपेक्षाही पवार यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.