

Shivsena Case: शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबतच्या सलग सुनावणीला सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा आजपासून सुरुवात झाली. सध्या एकनाथ शिंदे यांच्यावतीनं अॅड. नीरजकिशन कौल हे कोर्टात बाजू मांडत आहेत. आजच्या युक्तीवादात त्यांनी शिवसेनेच्या घटनेसंदर्भातील काही सडेतोड महत्वाच्या नोंदी कोर्टाच्या समोर ठेवल्या. यामुळं त्यांनी मांडलेले मुद्देही या खटल्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात. इतकंच नव्हे ते निकालावर प्रभावही पाडू शकतात.
एकनाथ शिंदेंचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ नीरजकिशन कौल यांनी युक्तीवाद केला की, शिवसेना पक्षाच्या अधिकृत घटनेबाबतची सगळी कागदपत्रे कोर्टानं तपासली पाहिजेत. यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की, ठाकरे गटानं ज्या पक्ष घटनेवर दावा केला आहे, ती निवडणूक आयोगाकडं नोंदणीकृत नव्हती. त्याचप्रमाणे सन २०१८ मध्ये पक्षाच्या घटनेत जी सुधारणा करण्यात आली, त्याची नोंदणीच निवडणूक आयोगाकडं केली गेली नव्हती. त्यामुळं दीर्घ पत्रव्यवहारानंतर १९९९च्या घटनेलाच सुधारित घटना म्हणून मान्यता देण्यात आली होती. निवडणूक आयोगानं त्याच घटनेच्या आधारे निर्णय घेतला पाहिजे आण घेतला गेला आहे.
दुसरा एक मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे पक्षांतर्गत लोकशाही आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भात. अॅड. कौल यांनी म्हटलं की, निवडणूक आयोग पक्षाच्या घटनेत काय असावं? हे ठरवत नव्हता पण पक्षातील पदरचना कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार काम करत आहे की नाही हे तपासण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला आहे. कारण जर पक्षात कुठल्याही निवडणुका न होता केवळ तात्पुरत्या मर्जीतील नियुक्त्या केल्या जात असतील तर ती रचना कार्यकर्त्यांची खरी इच्छा दर्शवत नव्हती. यामुळेच कार्यकर्त्यांच्या मनात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होत होता. हा मुद्दा देखील नीरजकिशन कौल यांनी उपस्थित केला. नीरजकिशन कौल यांनी जे मुद्दे मांडले आहेत, या मुद्द्यांची देखील कोर्ट दखल घेऊ शकतं. तसंच याच बाजूनं जर निकाल लागला तर भारतीय राजकारणात एक मैलाचा दगड ठरणारी ही केस ठरू शकते.
दरम्यान, शिवसेनेच्या पक्ष-चिन्हाबाबतच्या खटल्याची सुप्रीम कोर्टात गेल्या महिन्याभरापासून सलग सुनावणी सुरु आहे. सुरुवातीला दहा दिवस उद्धव ठाकरे यांचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी ठाकरेंची बाजू मांडली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एकनाथ शिंदेंच्यावतीनं अॅड. नीरजकिशन कौल हे बाजू मांडत आहेत. आजही कौल यांनीच युक्तीवाद केला. त्याच्या युक्तीवादानंतर आजची सुनावणी स्थगित झाली असून उद्या पुन्हा दुपारी २ वाजण्याच्या सुमाराम शिंदेंचे वकील आपला युक्तिवाद करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.