Pune Court Firing : पुण्यातील कोर्टाबाहेरच्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट! चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; दुचाकीही जप्त

Pune court premises Firing And Koyta Attack : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर आज दुपारी गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Crime News
Crime NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon News : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ला प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यापैकी दोघांना पळून जाताना दौंड-पाटस रस्त्यावरून, तर अन्य दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय हल्ल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर बुधवारी भरदिवसा मंदार मारुती किवळे (वय ३५) याच्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. या हल्ल्यात मंदार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले होते. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली होती. आता घटनेनंतर अवघ्या काही तासांत चार संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आल्याची प्राथमिक माहिती आहे.

कात्रजमधील हत्येचा बदला घेण्यासाठी हल्ला?

मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ल्याचे कनेक्शन कात्रजमधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणाशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. २०२५ मध्ये मालमत्तेच्या वादातून शुभम चव्हाण याची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील मंदार किवळे हा एक आरोपी आहे. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता.

शुभम चव्हाण याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मंदारवर हल्ला करण्यात आला असावा, असा प्राथमिक संशय तपास यंत्रणांना आहे. आता चार संशयित पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या चौकशीतून हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Crime News
Rohini Khadse : रोहिणी खडसेंच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटोच नाही ; राष्ट्रवादीचं चिन्ह अन् नावही नाही.. स्वतःच दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या...

मुरलीधर मोहोळांकडून कठोर कारवाईचे निर्देश

या घटनेची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही गंभीर दखल घेतली आहे. मोहोळ यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली. पुण्यात अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करत हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांना अटक करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

सुनेत्रा पवारांकडूनही दखल

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर घडलेली गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही.

पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक सतर्क आणि कठोर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यावर भर दिला जाईल. पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

Crime News
Rohini Khadse : पिते दूध डोळे मिटून जात मांजराची.. भाजप आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावर रोहिणी खडसेंनी सुनावलं गाणं, म्हणे 'या चोराच्या उलट्या बोंबा'

सुप्रिया सुळेंची टीका

दरम्यान, याच प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील 'एक्स' या समाजमाध्यमावर पोस्ट करत राज्याच्या गृहखात्यासह पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुळे यांनी म्हटले की, विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्याची ओळख आज गुन्हेगारीचे आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे, ही अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी बाब असल्याचे म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.