

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून रखडलेले ऑपरेशन टायगर अखेर पूर्ण झाले. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी सोमवारी (ता.22) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ओमराजे निंबाळकर, संजय दीना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय दिना पाटील या बंडखोर आमदारांसह शिवसेनेचे प्रमुख नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदेंसह इतरांनी जोरदार वक्तव्य केली. शिंदेंनी तर आमचीच खरी शिवसेना असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ती आहे. यामुळे येथे कोणावर अन्याय होणार नाही असे म्हणत या बंडखोर खासदारांची उमेदवारीच जाहीर केली. यामुळे शिवसेनेच्या कार्यक्रमात कमालीचा उत्साह होता. मात्र याच सोहळ्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या किरण पावसकर यांनी हे वादग्रस्त विधान केले असून त्यांनी "मुलाला आणि नातवाला सांभाळायला हे काय पाळणाघर आहे का?" असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे. कारण बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या काही भाषणांमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत असे आवाहन जनतेला केलं होते. पण आता त्यांच्या याच वक्तव्याची अशा पद्धतीने भर कार्यक्रमात शिंदेंच्या शिलेदाराकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. यामुले आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शिंदे आपल्याच पक्षाचे नेते पावसकर यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे ठाकरेंच्या खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी या खासदारांनी आपण हा निर्णय का घेतला याचे कारण देताना मतदारसंघातील विकास आणि निधीची कमतरतेचं कारण दिलं. यावेळी शिंदे यांनी देखील याआधी मी एक टायगर असे बोललो होतो. पण आज बघा एक नाही सहा 'टायगर' आज खऱ्या अर्थाने खऱ्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हीच शिवसेना खरी असून जी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची असल्याचे म्हणाले.
याच वेळी मंचावर येणाऱ्या खासदारांची जबाबदारी आता श्रीकांत शिंदे यांच्यावर असून ती घ्या. सहा लोक आपल्यासोबत येतायेत, त्यांना सांभाळा, असा आदेश शिंदेंनी दिला. दरम्यान, व्यासपीठावरून आपल्या भाषणात मात्र किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाना साधला. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ दिला. ज्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.
पावसकर यांनी आमचे नेते आपल्या खासदारांना सांभाळा असे म्हणत आहेत. मात्र दुसरीकडे आमच्या पुढच्या पिढीला सांभाळा, असे सांगितले गेले. दोन्ही शिवसेनेत हाच फरक असून याला सांभाळा-त्याला सांभाळा... हे काय पाळणाघर आहे का?" असे आक्षेपार्ह वक्तव्य करत दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या विधानाची खिल्ली उडवून त्यांचा अवमान केला.
यानंतर आता शिवसेनेत येऊन थेट बाळासाहेबांच्याच वक्तव्य आणि त्यांच्या विधानांवर अशा पद्धतीने खिल्ली उडवली जात असल्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून ठाकरेंच्या शिवसेनेसह र्वसामान्य शिवसैनिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच ज्या बाळासाहेबांनी ही शिवसेना उभी केली, त्याच पक्षात राहून हे लोक खिल्ली कशी उडवू शकतात? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असून ते आपल्याच पक्षाचे नेते पावसकर यांच्यावर कारवाई करतात का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.