Niphad Politics : नाशिकमध्ये भाजपची उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागाची महत्त्वाची संघटनात्मक बैठक १९ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली. भाजपचे अनेक दिग्गज नेते या बैठकीला उपस्थितीत होते. मात्र, ही बैठक नंतर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले.
भाजपची संघटन बैठक सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांचे आगमन झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. बैठकीनंतर अनिल कदम भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली होती.
परंतु, अनिल कदम यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या. आपण केवळ विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत आणि त्यांच्यासोबतच एकनिष्ठ राहणार असही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, त्याचवेळी संघटानात्मक बैठकीत गळ्यात उपरणे घालून भाजपत प्रवेश करणार नाही. करायचा ठरला तर दहा हजार लोकांच्या गर्दीत करेल असे म्हणत त्यांनी ससपेन्सही कायम ठेवला.
परंतु अनिल कदमांच्या या कृतीने निफाडच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कारण यापूर्वीही २०२५ मध्ये अनिल कदम हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हाही त्यांनी भाजपमध्ये जात असल्याची वार्ता खोटी असल्याचं स्पष्ट करत आपण उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ शिवसैनिक असल्याचं सांगत चर्चेला पुर्णविराम दिला होता.
परंतु अनिल कदम यांनी जरी सध्या 'आस्ते कदम' घेतले असले तरी त्यांचे कदम भाजपच्या दिशेने गुप्त हालचाली करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात निफाडच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसे झाल्यास निफाड तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलतील हे मात्र निश्चित.
निफाडच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघेही निफाडमधील पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, या दोघांमध्ये आता अनिल कदम यांचे चुलत बंधू भाजपचे नेते यतीन कदम यांचीही विधानसभेच्या आखाड्यात एण्ट्री झालेली आहे. त्यामुळे निफाडचे राजकारण ढवळून निघाले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल कदम यांना पराभव स्वीकारावा लागला. दिलीप बनकर यांना यतीन कदम यांनी बळ दिल्याने अनिल कदमांचा पराभव झाला. पराभव पदरी पडल्यापासून अनिल कदम हे अस्वस्थ असून पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीच्या जागा वाटपात निफाड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सुटतो. राष्ट्रवादीचे दिलीप बनकर हे विद्यमान आमदार आहेत. तर अनिल कदम यांचे बंधू यतीन कदम हे सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष असून विधानसभेची त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुढच्या टर्मला महायुतीत राष्ट्रवादी व भाजपमध्ये या जागेवरुन टशन होण्याची शक्यता आहे.
त्यातच अनिल कदमांची अलीकडची राजकीय पावले पाहता निफाडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीला आजून तीन वर्ष बाकी आहे. परंतु ऐनवेळी अनिल कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश झालाच तर यतीन कदम विरुद्ध अनिल कदम यांच्यातील वादाची धार अधिक तीव्र होऊन निफाडमध्ये राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या बैठकीला कदमांची उपस्थिती ही केवळ औपचारिक होती की त्यामागे भविष्यातील राजकीय गणित दडले आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, कदम यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा यापूर्वीही झाली होती. त्यामुळे भाजपच्या बैठकीतील त्यांची उपस्थिती या जुन्या चर्चेला पुन्हा बळ देणारी ठरली आहे. मात्र, केवळ बैठकीला उपस्थित राहिल्याच्या आधारावर कदम भाजपमध्ये प्रवेश करणार, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मात्र, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक नेतृत्व असलेल्या यतीन कदम यांनाही आगामी राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.