

प्रदीप पेंढारे-
Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने शिर्डीत आयोजित महाशेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. इंडिया आघाडीचा उल्लेख 'रावण', असा करत, 'कितीपण रावणांनी एकत्र येऊ देत, 'एक मोदी सबपे भारी' 2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होणार, ही काळ्या दगडावरील रेष असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
लगेच प्रेक्षकांमधून मोदी... मोदी... अशी घोषणाबाजी झाली. व्यासपीठावर बसलेले पंतप्रधान मोदी यांनीदेखील स्मित हास्य करत सभेतील नागरिकांना पाहत हात जोडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीला जाहीर भाषणात 'रावण' म्हटल्यावरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात साई समाधीला वंदन करून केली. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे श्रद्धा, सबुरी आणि ध्येय आहे. त्यामुळे भारत जगात महासत्ता होत आहे. वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी ते सहा वेळा आले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान मोदी ज्या कामांना हात लावतात, ते वेगाने पूर्ण होते. त्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावे लागते. यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे. ज्यांच्या पोटात दुखत आहे, त्यांच्यासाठी राज्यात बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू करून टाकला आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी इंडिया महाविकास आघाडीवर या वेळी जोरदार हल्ला चढवला. इंडिया महाविकास आघाडीचा त्यांनी 'रावण', असा उल्लेख केला. 'कितीपण रावण एकत्र येऊ देत, पण एक मोदी सबपे भारी', असे म्हणून 2019 मध्ये जनता तुमच्या पठीशी होती. आता 2024 मध्येदेखील तुमच्याबरोबर असणार आहे. 2024 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरील रेष आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
देशातील 140 कोटी लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. राज्यात दोन लाख कोटींची कामे झाली आहे. आज 14 हजार कोटींपेक्षा जास्त कामांचे उद्घाटन होत आहे. अडीच वर्षांपूर्वी सर्व प्रकल्प बंद होते. आता 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दीड लाखापर्यंतच्या कॅशलेक सुविधा सुरू करण्याचा निर्धार महायुती सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
निळवंडे प्रकल्पासाठी राजकीय नेते गेल्या 53 वर्षांपासून नारळ फोडण्याचे काम करत आहेत. यात तीन पिढ्या गेली आहेत. या धरणातून 182 गावांना पाणी मिळणार आहे. धरण पूर्ण झाले असले, तरी कालव्यांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. साईबाबांच्या 'सबका मालिक एक', या मंत्रानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'सबका साथ, सबका विकास', प्रेरित आहे. यशवंतराव चव्हाणसाहेबांचीदेखील महाराष्ट्राविषयी हीच भूमिका होती.
त्यामुळे आम्ही महायुतीत आलो आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांनी कष्टाने कमवलेल्या कामाला मोल देण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2017 मध्ये भूमिपूजन झालेल्या कामाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते होत आहे. निळवंडेसारखा प्रकल्प माझ्या जन्माअगोदर सुरू झाला होता. त्याचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. या प्रकल्पासाठी मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी खूप मेहनत घेतली. केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत महाराष्ट्राला 30 हजार कोटी रुपये सिंचन क्षेत्राला दिले.
महाराष्ट्रातील 50 टक्के भागात पाऊस नसतो. त्यामुळे तिथे दुष्काळ असतो. तिथे पाणी पोहाेचवल्यास महाराष्ट्रात आत्महत्यामुक्त होईल. गोदावरीचे पाणी दक्षिणकडे वळवण्याचा प्रकल्प तयार आहे. यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होईल. यासाठी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी आशीर्वाद द्यावेत, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून केली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.