

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या विराजमान झाल्या असून शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. मात्र, अजित पवार यांच्याकडील अर्थ व नियोजन खाते सुनेत्रा पवारांना देण्यात आलेले नाही त्यावरुन राजकीय चर्चा सुरु आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याकडील सर्व खाती मिळतील अशी चर्चा होती. मात्र अजित पवार यांच्याकडे असलेल्या चार खात्यापैकी तीन खाती सुनेत्रा पवार यांना देण्यात आली आहे. क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली. महत्वाचे असलेले अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहे.
सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं का देण्यात आल नाही यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मोठा गौप्य स्फोट केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी अर्थ खाते हे मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडेच ठेवावे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्र्यांनीच अर्थसंकल्प सादर करावा अशी विनंती केल्याचे बातम्यांमधून कळत असल्याचं महाजन म्हणाले.
एकीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीने राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील भुजबळ, तटकरे, पटेल या नेत्यांच्या भूमिका पुन्हा चर्चेत आल्या आहेत. तर दुसरीकडे त्या आधारावरच येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर पुढील काळात अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिले जाईल अशी माहिती समोर येत आहे.
सध्या सुनेत्रा पवार या दु:खाच्या प्रसंगात आहेत. त्यातून त्यांना सावरण्यास काही वेळ जाईल. तसेच सुनेत्रा पवार यांना प्रशासकीय अनुभवाची कमतरता आहे. राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी म्हणजे अगदी तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत लगेचच अर्थ खात्याचा अनुभव नसताना खातं देणं जिकिरीचे असू शकतं.
अजित पवार यांच्याकडून 2026-27 च्या अर्थसंकल्पाची तयारी जवळपास पूर्ण करण्यात आल्याची माहिती आहे. अशात अर्थसंकल्प फायनल करताना व त्यात बदल सुचवायचे असल्यास सुनेत्रा पवारांसाठी ते अडचणीचं गेलं असतं. यामुळे सध्या अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आल्याचे कळते. दरम्यान, अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर पुन्हा अर्थ व नियोजन खाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच अर्थात सुनेत्रा पवार यांच्याकडे दिले जाईल अशी शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.