
थोडक्यात बातमी:
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असून, राजकीय पक्षांमध्ये इनकमिंगला वेग आला आहे.
माजी आमदार शिरीष चौधरी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असून, त्यांच्यासोबत ४००-५०० कार्यकर्तेही येणार आहेत.
चौधरी यांच्या प्रवेशामुळे अंमळनेर आणि जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
Jalgaon News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. मात्र, आता हा तिढा सुटला असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच स्थानिकच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, आता सर्व राजकीय पक्षांत इनकमिंग आणि आऊटगोईंगला उधाण आलं आहे. अशातच एका खान्देशातील माजी आमदारानं एकनाथ शिंदेंबाबत (Eknath Shinde) मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनी महायुतीची वाट धरली. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुसाट असल्याचं दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिकच्या निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी राज्यात शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवतानाच दौरे, बैठका,मेळावे,भेटीगाठी यांच्यावर भर दिला आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांतील नाराज अनेक बड्या नेत्यांना शिवसेना पक्षात आणण्यासाठी गळ टाकण्यास सुरू आहे. याचदरम्यान, आता आणखी एक मोठा पक्षप्रवेश लवकरच शिवसेनेत होण्याची शक्यता आहे.
अंमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. चौधरी यांनी अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आमदारकी खेचून आणली होती. ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
शिरीष चौधरी यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अंमळनेर मतदारसंघातून भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढविली होती.मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यांनी दोन क्रमांकाची मते मिळवली होती. या मतदारसंघात चौधरी यांचा राजकीय दबदबा राहिला आहे.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिरीष चौधरी यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. चौधरी यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची अंमळनेरसह जळगाव जिल्ह्यातली ताकदही वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेतील पक्षप्रवेशाविषयी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार,आजी – माजी नगरसेवक, सरपंच यांसह सुमारे 400 ते 500 कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे.
अमळनेर मतदारसंघात विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान मंत्री अनिल पाटील मैदानात होते. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. याचवेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पाटलांना या मतदारसंघात चांगली टक्कर दिली होती. पण अनिल पाटील हे विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल पाटील यांना 1 लाख 9 हजार 445 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांना 76 हजार 10 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे अनिल शिंदे यांना 13 हजार 798 मते मिळाली आहेत. या निवडणुकीत अनिल पाटील यांनी चौधरी यांचा 33 हजार 435 मतांनी पराभव केला होता.
त्यापूर्वी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अनिल पाटील यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा पराभव केला होता. त्यांना भाजपने पाठिंबा जाहीर केला होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी जाहीर होणार?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
शिरीष चौधरी कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत?
ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शिरीष चौधरी यांच्यासोबत किती कार्यकर्ते येणार आहेत?
अंदाजे ४०० ते ५०० कार्यकर्ते त्यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश करतील.
चौधरी यांचा पक्षप्रवेश कोणत्या भागात महत्त्वाचा ठरणार आहे?
अंमळनेर आणि जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी तो महत्त्वाचा ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.