

Maharashtra politics : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे या महापालिकांमध्ये आपले नेतृत्व सिद्ध करत भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तीन्ही पालिकांमध्ये भाजपचे कमळ पुन्हा फुलवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाजन यांच्यावर या तीन्ही महापालिकांची जबाबदारी सोपवली होती. त्याप्रमाणे सगळ्या आव्हानांवर मात करत संकटमोचकाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे. तीन्ही महानगरपालिकांवर भाजपचे महापौर विराजमान झाले आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर महापालिकांच्या निवडणुकीच्या परीक्षेतही महाजन पहिल्या नंबरने पास झाले आहेत.
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिक कुंभनगरीत भाजपचा महापौर विराजमान करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नाशिकमध्ये भाजपच्या हिमगौरी-आहेर आडके या भाजपच्या महापौर झाल्या आहेत. स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने मोठ्या भावाची भूमिका पार पाडत शिवसेना-राष्ट्रवादीला सहभागी करुन घेत नाशिकचे उपमहापौर पद शिवसेनेला दिले. शिवसेनेचे विलास शिंदे हे नाशिकचे उपमहापौर झाले आहे.
जळगाव महापालिकेतही अपेक्षेप्रमाणे भाजपने सत्ता राखली आहे. जळगावात भाजपच्या दीपमाला काळे यांची तर उपमहापौरपदी शिवसेना(शिंदे गट) मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या दीपमाला काळे या जळगावच्या ८ व्या महिला महापौर ठरल्या आहेत.
धुळे महापालिकेत तर भाजपने विरोधकांचा धुव्वा उडवत महापौर व उपमहापौर दोन्ही पदांवर मजल मारली आहे. महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी जोत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची निवड झाली. दोघांना प्रत्येकी ५० मते मिळाली.
गेल्या महापालिका निवडणुकांमध्येही महाजन यांनी करिश्मा दाखवत नाशिक, जळगाव, धुळे या तीन महापालिकांमध्ये भाजपला सत्ता मिळवून दिली होती. विधानसभा निवडणुकीतही महाजन यांच्या नेतृत्वात भाजपला उत्तर महाराष्ट्रात अभुतपूर्व यश मिळाले होते. विशेष म्हणजे असं सांगितलं जात की, फडणवीस यांनी सगळ्या मंत्र्यांना आपआपल्या अखत्यारीतील नगरपालिका, महानगरपालिकेत भाजपला विजय मिळवून देण्याचे टास्क दिले होते. नगरपालिका व महानगरपालिका दोन्ही निवडणुकांमध्ये महाजन यांनी चांगली कामगिरी दाखवत उत्तर महाराष्ट्रात आपले नेतृत्व व वर्चस्व सिद्ध केलं. आता जिल्हा परिषद निवडणूक ही महाजन यांच्यासाठी तिसरी परीक्षा असणार आहे.
महापालिका निवडणुकीत महाजन यांची कसोटी पणाला लागली होती. विशेषत: नाशिकमध्ये आगामी कुंभमेळा आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी होती. त्यासाठी महाजन यांनी स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारुन मोठ्या प्रमाणात अन्य पक्षातील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये दाखल करुन घेतले होते. त्यावरुन पक्षांतर्गत नाराजी वाढली होती. एबी फॉर्म वाटपाच्यावेळी गोंधळ झाला होता. तपोवन वृक्षतोड प्रकरणाच्या आडून मंत्री महाजन यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांसह मित्रपक्षांकडूनही झाला. त्याचा भाजपला फटका बसेल अशी चर्चा होती. मात्र भाजपने नाशिकमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलं. १२२ पैकी ७२ म्हणजे बहुमतापेक्षा दहा जागा अधिक मिळवल्या. शिवाय मित्रपक्षांनी विरोधात निवडणूक लढवलेली असतानाही राज्यात व केंद्रात एकत्र असल्याने महायुतीचा धर्म पाळत शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेतलं. शिवसेनेला उपमहापौरपद दिलं.
महाजन यांनी कुंभनगरी नाशिकमध्ये सगळ्यांचे अंदाज फोल ठरवत आपले वर्चस्व सिद्ध केले. यातून त्यांनी एकप्रकारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. महाजन यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचा गड राखल्याने पालकमंत्रीपदाबाबत प्रश्न उपस्थितीत झाल्यावर महाजन म्हणाले, मी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता काम करतो. पालकमंत्री पदाचे झाले तर ठिक नाही झाले तर ठिक. आता पूर्णपणे कुंभमेळा केंद्रबिंदू असून त्याकडे सगळे लक्ष आहे. पालकमंत्रीपदाबाबत आग्रही नाही. झाले तर चांगलेच होईल नाही झाले तरी त्याच पद्दतीने काम चालू राहील असे सूचक विधान महाजन यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.