Maharashtra Politics : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिल्लीतून आणखी एक जबर धक्का बसला आहे. पक्षातून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होण्यास अधिकृत मान्यता दिली आहे.
बंडखोर खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिल्याने 6 बंडखोर खासदार शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले आहेत. या विलीनीकरणावर आता आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले, काही वेगळी अपेक्षा होती का? आम्ही हाच अन्याय झेलत आहोत आणि हे संपूर्ण देश पाहत आहे. आज सोनम वांगचुक यांच्यासोबत जे घडले, तेच आज संपूर्ण देशासोबत घडत आहे," असे म्हणत आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला.
दरम्यान उद्धव ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी दोन तृतीयांश म्हणजे 6 खासदार फुटले आहेत. ते आता अधिकृत शिवसेनेचे खासदार होतील. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाचे लोकसभेतील कार्यालय काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. कारण, कार्यालयासाठी एखाद्या पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून किमान 5 खासदार असणे गरजेचे आहे. तरच त्यांना एक कार्यालय दिलं जाऊ शकतं. पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेमध्ये केवळ तीन खासदार उरले आहेत.
मोदी सरकारला फायदा
संसदेत महिला आरक्षण कायदा लागू करण्यासाठी तसेच लोकसभा मतदारसंघांची फेररचना करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारला १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करायचे आहे. लोकसभेत आवश्यक दोन-तृतीयांश बहुमताच्या दृष्टीने शिंदे यांच्या शिवसेनेचे वाढलेले संख्याबळ सरकारसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.