BJP Vs Shinde Group: 'आम्हाला विरोधी पक्षांकडून त्रास नाही, त्रास आहे तो ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आम्हाला त्यांच्यापासून वाचवा' ही तक्रार अन्य कोणाची नव्हे, तर भाजपचा सहकारी असलेल्या शिवसेना शिंदे गटच्या पदाधिकाऱ्यांची आहे. शिवसेना शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यासाठी मतदारसंघ निहाय आढावा घेतला जात आहे.
जळगावच्या अजिंठा विश्रामगृहावर शिंदे गटाचे निरीक्षक सुनील चौधरी आणि निलेश पाटील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते. एरव्ही मंत्री महाजन आणि पालकमंत्री पाटील यांचे चांगलेच राजकीय सख्य आहे. मात्र पालकमंत्री पाटील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी मंत्री महाजन व त्यांचे पदाधिकारी कसा त्रास देत आहेत, याचा पाढा वाचल्याने काही वेळ पालकमंत्री पाटील यांचा देखील चेहरा पडला होता.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि पाचोरा बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी भाजपकडून त्यांना कसा त्रास दिला जातो हे सांगितले. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या सुरात सूर मिळवला. मंत्री गिरीश महाजन आमच्या प्रत्येक कामात अडथळा आणतात. कोणतेही काम करताना महाजन यांचे कार्यकर्ते आम्हाला त्रास देतात. एकाच आघाडीत असूनही आमची कामे होत नाहीत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्याला प्रामुख्याने भाजपचे मंत्री महाजन कारणीभूत आहेत, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या नेत्यांनी मंत्री महाजन यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा पाचोरा येथील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांनी या तक्रारींना दुजोरा दिला. भाजप बाबत कार्यकर्त्यांनी काही तक्रारी केल्या.
त्याची दखल पदाधिकारी आणि नेते घेतील मित्र पक्षाच्या नेत्यांशी बोलून त्यावर तोडगा काढला जाईल. सध्या आमचे सर्व लक्ष लोकसभा लोकसभा निवडणुकीवर आहे. महायुतीला वातावरण अनुकूल असून आगामी निवडणुकीसाठी प्रचारात सुसूत्रता असावी म्हणून निश्चितच या तक्रारींचे निवारण होईल असे सांगितले.
भारतीय जनता पक्षासह महायुतीतील एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आगामी निवडणुकींमध्ये चांगले यश मिळावे यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचा पालकमंत्री असताना भाजपचे गिरीश महाजन यांच्या विषयी तक्रारी आल्या. त्यामुळे महायुतीमध्ये किमान पाचोरा तालुक्यात तरी सर्व काही आलबेल नाही, असा संदेश गेला आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.