

Nashik News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एकीकडे 'एसआयटी'कडून कसून चौकशी सुरू असताना गुरुवारी(ता.2 एप्रिल) नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडली. यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पण या सुनावणीवेळी सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांच्यात पोलिस कोठडीसह गर्भपाताच्या गोळ्या,औषधांच्या मुद्द्यांवरुन जोरदार काऊंटर अॅटॅक झाल्याचं समोर येत आहे. तसेच न्यायाधीशांनी खरातलाही प्रश्न विचारल्याची माहिती आहे.
एसआयटी पथकाकडून सुरक्षेचं कारण देत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडे आजच्या सुनावणीसाठी भोंदूबाबा अशोक खरातला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याबाबतची मागणी करण्यात आली होती. न्यायालयानं ती मान्य केल्यानंतर न्यायालयात सुनावणीवेळी चक्कं 4 स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. यावेळी सरकारी पक्षाकडून वकील शैलेंद्र बागडे यांनी तर आरोपीच्या बाजूने वकील सचिन भाटे यांनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
याच सुनावणीदरम्यान, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अशोक खरातला नाव विचारलं. यावर स्पष्ट आवाज ऐकू न आल्यानं न्यायाधीशांनी खरातला जरा मोठ्यानं बोला असं सुनावलं. त्यानंतर न्यायाधीशांनी 'तुमचे वकील म्हणून भाटे वकील इथे बाजू मांडत आहेत, तेच तुमचे वकील आहेत का?' यावर खरातने 'हो' एवढंच उत्तर दिले.
तसेच नाशिक कोर्टात युक्तिवाद पार पडल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपी अशोक खरातला पुन्हा एक प्रश्न केला. न्यायाधीश म्हणाले, 'तुम्हाला काही बोलायचं आहे का?', यावर खरातनं हात जोडत फक्त 'काही नाही' असं उत्तर दिलं.
याप्रकरणाचे तपास अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी कोर्टात आरोपीनं पीडितेवर अत्याचार केल्यानं ती गर्भवती राहिली. पण यानंतर आरोपीनं दिलेल्या गोळ्यांमुळे गर्भपात झाला. लग्नाचं आमिष दाखवून आणि मरणाची भीती घालून महिलेवर अत्याचार झाल्याचंही यावेळी तपास अधिकारी सूर्यवंशी यांनी न्यायालयासमोर सांगितलं.
तसेच आरोपीकडू्न पीडितेच्या मुलांनाही धमकी देण्यात आली. गोळ्या आणि औषध कुठून आणले, त्यात काय होते याचा तपास अद्याप बाकी आहे. आरोपी पीडितेकडून आधारकार्ड आणि पॅनकार्ड मागत होता, हे कशासाठी होते याचा तपास करायचा आहे. या तपासासाठी खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाकडे केली.
यावर आरोपीचे वकील भाटे यांनी प्रतिवाद करताना हा आरोपीचा दुसरा गुन्हा आहे. यापूर्वी 14 दिवस पोलिस कोठडी झाली आहे. माझ्याकडे अद्याप फिर्यादची प्रत आलेली नाही. गर्भपात झाले असे म्हणतात, त्याचा कालावधी काय होता? तसेच व्हायरल झालेल्या काही सिलेक्टिव्ह व्हिडीओवरच गुन्हा दाखल झाला असून त्यावरच तपास सुरू असल्याचंही आरोपीचे वकील भाटे यांनी म्हटलं.
तसेच इतक्या दिवस पीडित गप्प का बसली? 2023 ला गर्भपात झाला तर 25 पर्यत खरातच्या संपर्कात कशी राहिली? फसवणूक अपहारचा गुन्हा हा नाही, आधार कार्ड पॅन कार्ड का घेतले याला अर्थ नाही. व्हिडीओ सिलेक्ट आहेत, तेच व्हायरल होत आहेत. त्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे नवीन तपास करणेसाठी कोठडीची गरज नसल्याचा दावा आरोपीचे वकील भाटे यांनी न्यायालयात सुनावणीदरम्यान केला.
सरकारी वकील शैलेंद्र बागडे म्हणाले, आरोपी मास्टर माईंड आहे. त्याने गंभीर गुन्हे केले आहे. तसेच आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचंही त्यांनी न्यायालयात सुनावणीदरम्यान युक्तिवाद करताना सांगितलं. त्यामुळे पुढील तपासासाठी अशोक खरातसाठी 7 दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचं न्यायालयासमोर म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.