

Nashik : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजाराची लाच घेताना लाचलुचपतकडून अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर एसीबीने त्यांच्या घरातील झाडाझडती घेतल्यानंतर मोठं घबाड हाती लागलं होतं. यात तब्बल ८५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ३२ तोळे सोनं यासह एनसीबीला काही मालमत्तांची कागदपत्रंही सापडली आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बडतर्फ मुख्याध्यापकाच्या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि.२) दुपारी महापालिकेत कारवाई केली होती. त्यानंतर लाचलुचपतकडून त्यांच्या घरी झाडाझडती घेतल्यानंतर ८५ लाखांची रोकड, ३२ तोळे सोने, उंटवाडीतील राहत्या फ्लॅटसह टिळकवाडीतील फ्लॅटची व आडगाव शिवारातील प्लॉटची कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यातील १२ लाख ७१ हजार रुपयांची रक्कम सील करण्यात आली आहे. याशिवायही आणखी काही बँकांची माहिती पथकाला मिळाली आहे. परंतु शनिवार आणि रविवारी बँकांना सुट्टी असल्यानं त्यांना माहिती मिळू शकली नाही.
नाशिक महापालिका शिक्षण अधिकारी सुनिता धनगर (Sunita Dhangar) या ५० हजारांची लाच घेताना अटक केल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. लाचखोरीचा आरोप असलेल्या चौथ्या शिक्षणाधिकारी धनगर या लाच घेण्यात निर्ढावलेल्या लाचखोर असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच शिक्षण विभागातच लाचखोरीची प्रकरणे का घडतात ? याबाबत सरकार कधी आक्रमक पावलं उचलणार याची चर्चा सुरु झाली आहे.
'हा' समान दुवा....
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रामचंद्र जाधव यांना निवृत्तीच्या पूर्वसंध्येला लाच घेताना अटक झाली होती. त्यानंतरचे प्रवीण आहेर यांच्यावर पुणे येथे कारवाई झाल्याचं बोललं जातं. त्यानंतर श्रीमती झनकर आणि आता श्रीमती धनगर सर्व शिक्षण विभागाचेच आहेत, हा त्यांच्यातील समान दुवा आहे. लाच घेतल्याप्रकरणी ज्यांच्यावर कारवाई झाली, त्यांना काही दिवसांतच शासनाने पदोन्नती देऊन चांगल्या पदांवर नियुक्ती केल्याचीही जोरदार चर्चाही सुरु आहे.
मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार ...
मुख्याध्यापकाकडून पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या नाशिक(Nashik) महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्या पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत(ACB)च्या पथकाने केलेल्या तपासात त्यांच्या घरातून ८५ लाखांची रोकड, ३२ तोळे सोने आणि मालमत्तेचे कागदपत्रे असा कोट्यवधींची माया जप्त केली आहे. दोन दिवस सलग सुट्ट्यांमुळे बँकेची माहिती पथकाला मिळू न शकल्याने आज (दि.५) धनगर यांच्या बँक खात्यातून आणखी घबाड सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.