

Nashik Politics : एकनाथ शिंदे यांच्याकडून आता नाशिक महापालिकेतही 'ऑपरेशन टायगर' राबवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नाशिक महानगरपालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 12 नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा असून या नगरसेवकांना पक्ष प्रवेशासाठी पाच कोटींच्या विकासनिधीची ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे हे सावध झाले आहेत. त्यांनी तातडीने आपले जवळचे सहकारी व शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांना नाशिकमध्ये डॅमेज कंट्रोलसाठी धाडलं आहे. मिर्लेकर तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले असून, आज त्यांनी पदाधिकारी आणि नगरसेवकांची अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक बोलावली आहे.
काल, उबाठाचे गटनेते केशव पोरजे यांनीही या वृत्ताला दुजोरा देत धक्कादायक खुलासा केला. उपमहापौरपद हवे असेल तर उबाठाचे नगरसेवक फोडा असे टार्गेट शिवसेनेतील काही स्थानिक नेत्यांना देण्यात आल्याचा आरोप पोरजे यांनी केला. ज्यांना उपमहापौर बनायचे आहे ते एजंट पाठवून आमच्या नगरसेवकांना 5 कोटी रुपयांच्या प्रभाग निधीचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.
एक वकील असलेला एजंट, ज्याला स्वतःला स्वीकृत नगरसेवक व्हायचे आहे आणि जो सध्या पक्ष संघटनेतही नाही, तो आमच्या नगरसेवकांशी संपर्क साधत आहे,असा दावा गटनेते पोरजे यांनी केला.
या पक्षांतराच्या विरोधात ठाकरेंच्या नगरसेवकांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली आणि आपली वज्रमूठ दाखवली. आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही, आम्ही सर्वजण निष्ठावंत आहोत," असा दावा त्यांनी केला. आमची विकासकामांसाठी जाणीवपूर्क अडवणूक केली जात असून, आम्ही महापालिका आयुक्तांना निधी देण्यासाठी निवेदन दिले आहे. ज्याप्रमाणे खासदार फुटले तेव्हा 'ऑपरेशन तुडवा' राबवण्यात आले त्याचप्रमाणे, आता 'ऑपरेशन तुडवा' राबविणार असल्याचा सज्जड दमही उबाठा गटनेते पोरजे यांनी दिला.
नाशिक मनपामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एकूण 15 नगरसेवक आहेत. झालेल्या शक्तिप्रदर्शन व पत्रकारपरिषदेला 13 नगरसेवक प्रत्यक्ष हजर होते. तर नगरसेविका मंगला आढाव यांच्या सासूचे निधन आणि मुरलीधर भामरे यांच्या चुलत्यांचे निधन झाल्याने हे दोघे कौटुंबिक दुःखद कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, भामरे यांच्या वतीने मुलगा तेजस यांनी पत्रकारपरिषदेला हजेरी लावून पक्षप्रमुखांसोबत असलेली निष्ठा जाहीर केली. यातून पंधरा नगरसेवक एकत्र असल्याचा संदेश देण्यात आला.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली असून, आज रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत रवींद्र मिर्लेकर ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर सविस्तर आढावा घेणार आहेत. या बैठकीत रवींद्र मिर्लेकर नगरसेवकांना काय संदेश देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून नाशिकमध्ये घडामोडी गतिमान झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.