

योगेश फरपट
Akola News: अकोला महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणूक ही केवळ पदांची निवड नव्हती, तर शहरातील राजकीय ताकदीची खरी कसोटी होती. निवडणुकीपूर्वी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने सत्ताबदलाचा जोरदार दावा करत वातावरण तापवले होते.
“आमचा महापौर होणारच” अशा ठाम घोषणांमुळे अकोल्यात राजकीय उलथापालथ होणार, अशी प्रतिमा तयार करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी हे सर्व दावे फोल ठरले आणि भाजपप्रणित शहर सुधार आघाडीने 45 मते मिळवत आपली सत्ता पुन्हा एकदा अभेद्य असल्याचे सिद्ध केले.
बहुमतासाठी आवश्यक असलेले 41 नगरसेवक आमच्याकडे असल्याचा दावा विरोधकांनी सातत्याने केला होता. मात्र मतदानाच्या वेळी त्यांना केवळ ३२ मते मिळाली. या आकड्यांनीच विरोधी आघाडीच्या राजकीय अपरिपक्वतेचा आणि दिशाहीन रणनीतीचा पर्दाफाश केला. आकड्यांचे राजकारण मांडताना विरोधक विसरले की केवळ संख्याबळ पुरेसे नसते; त्यामागे विश्वास, शिस्त आणि समन्वयाची गरज असते. विरोधकांची सर्वात मोठी चूक म्हणजे तात्पुरत्या आघाडीवर अवलंबून राहणे. काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची एकजूट ही नैसर्गिक कमी आणि गरजेपोटी अधिक होती.
विशेषतः एमआयएमच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचे गणित रचले गेले. मात्र मतदानाच्या वेळी एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिल्याने संपूर्ण डाव उधळला गेला. यावरून स्पष्ट होते की विरोधकांकडे आकड्यांचा अंदाज होता, पण माणसांचा विश्वास जिंकण्याची क्षमता नव्हती. याउलट भाजपने या निवडणुकीत कोणतीही आक्रमक घोषणा न करता शांत, संयमी आणि परिणामकारक रणनीती अवलंबली.
भाजपकडे स्वतःचे 38 नगरसेवक असतानाही त्यांनी मित्रपक्ष आणि अपक्ष नगरसेवकांना सोबत घेत 45 मतांचा भक्कम आकडा गाठला. हा विजय केवळ संख्येचा नाही, तर भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा, नेतृत्वावरील विश्वासाचा आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी राजकारणाचा आहे. सत्ता टिकवण्यासाठी केवळ घोषणाबाजी नव्हे, तर सातत्यपूर्ण संवाद आणि विश्वासार्हता आवश्यक असते, हे भाजपने पुन्हा अधोरेखित केले.
एकूणच, अकोला महापालिकेतील हा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला महत्त्वाचा धडा देणारा आहे. तात्पुरत्या आघाड्या, फुगवलेले आकडे आणि हवेतले दावे यावर सत्ता मिळत नाही. मजबूत संघटना, विश्वासार्ह नेतृत्व आणि शिस्तबद्ध रणनीती असल्याशिवाय सत्ता टिकवणे अशक्य आहे.
भाजपने ही बाब पुन्हा एकदा सिद्ध केली आहे, तर विरोधी पक्षांसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाची गंभीर संधी ठरतो. आगामी काळात जर विरोधकांनी आपल्या चुका सुधारल्या नाहीत, तर अकोल्यातील राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिकच बळकट होत जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या संपूर्ण प्रक्रियेत सर्वाधिक नुकसान उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे झालेले दिसते. महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने ५४ जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र प्रत्यक्ष निकालात केवळ ६ जागांवरच त्यांना विजय मिळवता आला. उर्वरित ४८ जागांवरील दारुण पराभवामुळे शहरातील ठाकरे सेनेची संघटनात्मक कमजोरी उघड झाली आहे. “चमत्कार घडेल” अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली, पण प्रत्यक्ष राजकारणात चमत्कार नव्हे तर मजबूत संघटना लागते, हे या निकालाने स्पष्ट केले.
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न झाला, मात्र स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका, प्रभावी नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात हे पक्ष अपयशी ठरले. सत्ताबदलाच्या घोषणा करताना जनतेमध्ये अपेक्षा निर्माण करण्यात आल्या, पण त्या पूर्ण करण्याइतकी तयारी दिसून आली नाही.
राज्यात अद्याप अनेक ठिकाणी महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणुका होणे बाकी असताना, अकोला महानगरपालिकेत मात्र भाजपने आपले सत्ता गणित अचूक जुळवत महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. विरोधकांकडून सत्ताबदलाचे दावे केले जात असतानाच भाजपने शांत, पण ठोस रणनीती राबवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपप्रणीत शहर सुधार आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली. या विजयामुळे केवळ अकोल्यातीलच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही भाजपची संघटनात्मक ताकद अधोरेखित झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता टिकवण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त, समन्वय आणि नेतृत्व भाजपकडे असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. विजयी उमेदवारांनी या यशाचे श्रेय भाजप प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर आणि खासदार अनुप धोत्रे यांना दिले आहे. या तिघांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अकोल्यात प्रभावी राजकीय समन्वय साधला, नगरसेवकांमध्ये विश्वास निर्माण केला आणि निवडणुकीपर्यंत सत्ता गणित अखंड राखले, असे विजयी उमेदवारांनी नमूद केले. अकोल्यात भाजपने दाखवलेली संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वाची पकड ही राज्यपातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.