Nagpur News : रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आपले बंड कायम ठेवले आहे. त्यांना क्रिकेटची बॅट निवडणूक चिन्ह मिळाले आहे. आता त्यांची बॅट कोणाला ठोकून काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचा सामना शिवसेनेचे आशिष जयस्वाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विशाल बरबटे यांच्याशी होणार आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने मागितला होता. मात्र, तो आमचा परंपरागत मतदारसंघ असल्याने उद्धव सेनेने सोडण्यास नकार दिला. येथून शिवसेनेचे आशिष जयस्वाल तीन वेळा निवडून आले होते. ते आता शिंदे सेनेत दाखल झाले असून महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव सेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे मुळक येथून दहा वर्ष तयारी करीत होते.
गेल्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी काँग्रेसनेच (Congress) कापली होती. मात्र, त्यांनी आशा सोडली नाही. मतदारसंघ वाऱ्यावर सोडला नाही. पक्षाची बांधणी करीत राहिले. यावेळी महाविकास आघाडीमुळे त्यांची अडचण झाली. त्यामुळे मुळकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना उमेदवारी मागे घ्यावी यासाठी कोणीच आग्रह केला नसल्याचे कळते. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे (Shyamkumar Barve) यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तेव्हाच त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे आणि ते माघार घेणार नाही हे स्पष्ट झाले होते.
मध्य नागपूरमधून वंचितकडून लढण्यास तयार झालेले माजी मंत्री अनिस अहमद यांना तातडीने अर्ज भरू नये, असे सांगण्यात आले. त्यांना लगेच पक्षात पुन्हा प्रवेश दिला. विधान परिषदेचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. जिल्ह्यातील इतर मतदारसंघातील छोट्या मोठ्या बंडखोरांची काँग्रेस नेत्याने समजूत काढली. त्यांना उमेदवारी मागे घेण्यास राजी करण्यात आले.
मुळक हे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. ते मुख्यमंत्री असताना मुळक अर्थ राज्यमंत्री होते. ऊर्जासह अनेक खात्याचे ते राज्यमंत्री होते. असे असताना मुळकांनी उमेदवारी कायम ठेवल्याने त्यांचे बंड काँग्रेस पुरस्कृत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.