
Nagpur, 02 January : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकही उमेदवार नागपूर जिल्ह्यातून निवडून आला नाही. राष्ट्रवादीचे विदर्भाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख, दुसरे नेते व माजी मंत्री रमेश बंग हेसुद्धा पराभूत झाले आहेत. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे हे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात लाखभराच्या मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे नेत्यांना सोडून एक-एक पदाधिकारी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ लागले आहेत. देशमुख आणि बंग यांचे समर्थक साथ सोडत असल्याने पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान माजी आमदार दीनानाथ पडोळे, राजभाऊ टांकसाळे, दिलीप पनकुले, बजरंगसिंग परिहार यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर रमेश बंग यांचे समर्थक हिंगणा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संतोष नरवडे, ज्येष्ठ नेते प्राचार्य सुरेंद्र मोरे, व्यापारी आघाडीचे अमित हुसनापुरे यांनीही तुतारीची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गणेशपेठ येथे नव्याने उघडलेल्या विदर्भ विभागीय कार्यालयायात जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या उपस्थितीत या सर्वांनी पक्ष प्रवेश केला.
विशेष म्हणजे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनीसुद्धा अधिवेशनाच्या काळात अजित पवार यांची भेट घेतली, त्यामुळे तेसुद्धा शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे. ग्रामीण भागातील युवा नेत्यांची फळी सलील देशमुख यांच्यासोबत आहे. ते अजित पवार गटात आल्यास मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थकही सोबत येऊ शकतात. अनेकाजण जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या संपर्कात असल्याचे समजते.
रमेश बंग यांचे चिरंजीव योगेश बंग हेसुद्धा जिल्हा परिषद सदस्य आहेत. बंग यांचे समर्थक आधीच अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे आणि रमेश फुले यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केली होती. दोघांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले आहेत.
प्रदेश उपाध्यक्ष सतीश शिंदे यांनी निवडणुकीच्या काळातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्या सर्वांना पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत परतण्याचे वेध लागले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बंडखोरांना परत घेण्यास विरोध केला आहे, त्यामुळे अनेकांचे प्रवेश थांबले असल्याचे समजते.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.