ICICI Lombard News: आयसीआयसीआय लोंबार्डवर गुन्हे दाखल, शिवसेनेने (ठाकरे) केला होता पाठपुरावा !

Farmer : कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर बाबाराव इंगळे यांनी तक्रार केली होती.
Akola
AkolaSarkarnama
Published on
Updated on

Akola District News : पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर बाबाराव इंगळे यांनी केली होती. त्यावरून खदान पोलिसांनी आज कंपनीच्या प्रतिनिधींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (The agriculture officials had complained)

पंचनाम्यावरील क्षेत्र, नुकसान टक्केवारीत खाडाखोड करणे, खोट्या स्वाक्षऱ्या करणे, बाधित क्षेत्रापेक्षा व नमूद नुकसानाच्या टक्केवारीपेक्षा कमी रक्कम अदा करणे, अशा विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन कोटी ९५ लाख रुपयांच्या फसवणुकीचाही ठपका या तक्रारीत ठेवला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला होता.

डॉ. इंगळे यांनी खदान पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, अकोला जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२-२३ साठी पंतप्रधान पीक विमा योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीवर होती. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, तेल्हारा, पातूर, बाळापूर या तालुक्यांत कंपनीमार्फत खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, कापूस आदी पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला होता.

योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विमाधारक शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र बाधित झाल्यास क्षेत्राचा कृषी सहायक, नुकसानग्रस्त शेतकरी, विमा कंपनी प्रतिनिधीच्या उपस्थितीत नुकसानाचा पंचनामा केला जातो. पंचनामा अहवालावर सर्व उपस्थितांची स्वाक्षरी घेतली जाते. त्यानंतर हा पंचनामा ग्राह्य समजला जातो. खरीप हंगामात पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे व काढणी पश्‍चात झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांनी विहित कालमर्यादेत कंपनीला पूर्व सूचना दिल्या.

नुकसान भरपाईबाबत दर आठवड्याला जिल्हास्तरावर बैठक होते. अशाच एका बैठकीत बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी काढणी पश्‍चात नुकसान भरपाईचे एकाही शेतकऱ्याचे सर्वेक्षण झालेले नसल्याचे निदर्शनात आणून दिले. अशी परिस्थिती जिल्ह्यातील इतरही तालुक्यांत होती. नैसर्गिक आपत्तीअंतर्गत केलेल्या पंचनाम्यावरील क्षेत्र व नुकसानाची टक्केवारी यामध्ये देखील कंपनीकडून खाडाखोड केल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती व अहवाल मागवण्यात आले.

Akola
Akola : पाणी आरक्षण, पूल अन् राजकीय ट्रँगल, भाजप, वंचित, शिवसेनेत रंगले वाकयुद्ध !

विमा कंपनीच्या जिल्हा व तालुका प्रतिनिधींनी पंचनाम्यांवर खाडाखोड करून नुकसानाचे क्षेत्र व टक्केवारी कमी केलेली दिसून आली. अकोला तालुक्यात विमा कंपनीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालात १२ हजार ४५८ शेतकऱ्यांचे अर्ज सादर केल्याबाबत ई-मेलद्वारे कळवले. परंतु, प्रत्यक्षात तीन हजार ४९१ सर्वे अर्ज सादर केल्याचे पडताळणीत समोर आहे. सादर केलेल्या या तीन हजार ४९१ पैकी दोन हजार ९९१ ची पडताळणी केली. पडताळणी केलेल्या सर्वे अर्जांमध्ये ८० अर्जांवर खोट्या स्वाक्षरी केलेल्या आढळल्या. ४१ अर्जांवर बाधित क्षेत्रापेक्षा व नमूद नुकसानीच्या टक्केवारीपेक्षा कमी रक्कम अदा केली.

सहा अर्ज विमा कंपनीद्वारे पुरविण्यात आलेल्या ‘क्लेम पेड’ यादीत समाविष्ट नाहीत. विमा कंपनीने सर्वे अर्जांची संख्या १२ हजार ४५८ कळवली. परंतु, १४ हजार ६०८ शेतकऱ्यांची ‘क्लेम पेड’ यादी सादर केली. बार्शीटाकळी तालुक्यात कंपनीने सादर केलेल्या ‘मिस कॅलक्युलेशन शिट’मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या नावानुसार छायांकित प्रती सादर केल्या नसल्यामुळे संकलित माहितीमध्ये ती नावे तपासता आलेली नाहीत. पंचनाम्यांमध्ये खाडाखोड नसतानासुद्धा शेतकऱ्यांना ‘मिस कॅलक्युलेशन शिट’नुसार कमी रक्कम अदा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातही असेच गंभीर प्रकार विमा कंपनीच्या कारभारात समोर आले आहेत.

Akola
Akola News: वर्ष झाले; महानगरपालिकेवर प्रशासक राज कायम, इच्छुकांचा तयारीला ब्रेक !

हे गुन्हे झालेत दाखल..

भादंवि ४०९ (विश्वासघात), ४२० (फसवणूक), ४६५ (बनावटीकरण), ४६७ (ठकवणूक, फसवणूक), ४६८ (खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक करणे), ४७१ (बनावट दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख खरे असल्याचे भासवून फसवणूक करणे), ३४ (समान उद्देशाने एकत्र येऊन गुन्हा करणे)

यांच्यावर झाला गुन्हा दाखल..

या प्रकरणात आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रभास अरबाईन, कमलेश पाटील, निलेश सोनोने, योगेश घाटवट, प्रफुल्ल गव्हाने, महेश दांदळे, अमोल टाले, नरेंद्र बहाकार, आशिष भिसे, विकास शिंदे यांना आरोपी करण्यात आले आहे.

सत्याचा विजय..

आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा कंपनीकडून फसवणूक झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी (Farmers) जिल्हा कृषी अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकारी, (Collector) विभागीय आयुक्त, राज्याचे कृषी संचालक, राज्याचे कृषी सचिवापर्यंत पोहोचले होते. अखेर सत्याचा विजय झाला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सिद्ध झाले असून, शिवसेनेने (Shivsena) केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर कृषी विभागाला विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागला, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख गोपाल दातकर म्हणाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com